नजरचुकीने दिलेले पन्नास हजार कामगारास परत
By Admin | Updated: June 8, 2016 00:47 IST2016-06-08T00:47:33+5:302016-06-08T00:47:57+5:30
प्रामाणिकपणाचे प्रत्यंतर : कदमवाडीतील सराफाचा सत्कार

नजरचुकीने दिलेले पन्नास हजार कामगारास परत
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक येथे खड्याची अंगठी घेण्यासाठी आलेल्या तरुणाला नजरचुकीने दिलेले पन्नास हजार रुपये एका कामगाराचे असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. सुनील भूपाल पोतदार (वय ३०, रा. बापूरामनगर, कळंबा) असे त्याचे नाव आहे. शाहूपुरी पोलिसांनी कदमवाडीतील सराफ अमोल विजय पवार यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करून सुनील पोतदार याला पन्नास हजार रुपये परत केले. नजरचुकीने दुसऱ्याला दिलेले पैसे परत मिळाल्याने सुनील भारावून गेला.
अमोल पवार यांच्याकडे मध्यवर्ती बसस्थानक येथे अनोळखी तरुण पन्नास हजार रुपये देऊन गेला होता. खड्याची अंगठी व सोन्याचे तोडे घेण्यासाठी आलेल्या पवार यांना पैसे मिळाल्याने धक्काच बसला. पैसे कोणाचे, ते आपल्या हातात देऊन जाणारी व्यक्ती कोण? या विचाराने ते हैराण झाले. त्यांनी ते पन्नास हजार रुपये शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिले. पोतदारनेघरखर्चासाठी मित्राकडून उसने पैसे घेतले होते. मित्र बाहेरगावी गेल्याने त्याने त्याला ‘मध्यवर्ती बसस्थानक येथे मी एका तरुणाला पाठवितो त्याच्याकडे पैसे दे,’ असा निरोप दिला. त्यानुसार पोतदार बसस्थानक परिसरात येताच अमोल पवार अंगठी घेण्यासाठी याठिकाणी थांबले होते. मित्राने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे तीच व्यक्ती असेल असे समजून पोतदारने पन्नास हजार त्याच्याकडे दिले. दरम्यान,पोतदार याने मित्राला पैसे मिळाले का अशी फोनवरून विचारणा केली. त्याने नाही असे सांगितल्यावर पोतदार हडबडून गेले.नजरचुकीने पैसे दुसऱ्याच्याच हाती गेल्याने पोतदार कासावीस झाले.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल रणजित देसाई त्याच्या ओळखीचे होते. त्यांनी याप्रकाराची माहिती त्यांना दिली. दरम्यान, या पैशाबाबत‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. देसाई यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक येथील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यामध्ये अमोल पवार व सुनील पोतदार यांच्यात पैशांची देवाण-घेवाण होतानाचे फुटेज पोलिसांना
मिळाले. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले यांनी अमोल पवार व पोतदार यांना पोलिस ठाण्यात बोलावून सीसीटीव्ही फुटेज दाखविले. त्यांनी परस्परांना ओळखले. पोलिस निरीक्षक चौगले यांनी पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करून ते पैसे पोतदार याच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
आपल्यासारखा त्रास दुसऱ्याला नको म्हणून...
आजकाल रस्त्यात सापडलेले दहा रुपये गुपचूप खिशात घालण्याची प्रवृत्ती बळावत चालली असताना सहजपणे मिळालेले चक्क ५० हजार रुपये परत देण्याचे माणूसपण अमोल पवार यांनी दाखविले. काही दिवसांपूर्वी त्यांचेही असेच काही पैसे पडले होते. ते त्यांना परत मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांना त्याचा खूप मनस्ताप झाला. मला ज्यांचे पैसे मिळाले, त्या व्यक्तीसही असाच मनस्ताप झाला असेल. आपल्या वाट्याला जे आले, ते त्यांना सहन करावे लागू नये, या भावनेने पवार यांनी स्वत: पोलिसांत जाऊन पैसे परत केले.