माघार संपली, थेट लढाई सुरू

By Admin | Updated: October 17, 2015 00:57 IST2015-10-17T00:57:08+5:302015-10-17T00:57:27+5:30

कोल्हापूर महापालिका निवडणूक : ५०६ उमेदवार रिंग्ांणात; दोन माजी महापौरांसह २६ नगरसेवकांचा समावेश

The retreat ended, started fighting directly | माघार संपली, थेट लढाई सुरू

माघार संपली, थेट लढाई सुरू

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची सत्ता कोणाच्या हाती सोपवायची, याचा फैसला करणाऱ्या महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुरंगी, तसेच चुरशीने लढती होणार हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. शहरातील ८१ प्रभागांत एकूण ५०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षीय पातळीवर निवडणूक होत असल्याने बहुतांश अपक्ष उमेदवारांनी नांगी टाकत या निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. महानगरपालिका निवडणुकीसाठी
१ नोव्हेंबरला मतदान होत आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ६ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ७८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २७७ उमेदवारांनी गेल्या दोन दिवसांत माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ५०६ उमेदवार राहिले. या निवडणुकीत नंदकुमार वळंजू, जयश्री सोनवणे हे दोन माजी महापौर, २६ विद्यमान नगरसेवक, २० माजी नगरसेवक, राजकीय नेत्यांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते आपले राजकीय भवितव्य अजमावून पाहत आहेत. कॉँग्रेसचे नगरसेवक सचिन चव्हाण व भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांना या निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे.
राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची शहरावरील ताकद सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. देशात आणि राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप व शिवसेना या पक्षांनी निवडणुकीत सवता सुभा मांडत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. भाजपने मात्र स्थानिक ताराराणी आघाडी, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी महायुती करत नवी व्यूहरचना आखली आहे. भाजपची रणनीती ओळखून तेवढ्याच ताकदीने शिवसेनेनेही स्वतंत्रपणे तयारी केली आहे. सध्या महानगरपालिका सभागृहात सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य आघाडी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा, भाकप, माकप, तसेच राजू माने प्रणीत एस फोर ए आघाडी, आदी पक्ष व आघाड्यांनी आपापल्या ताकदीनुसार उमेदवार उभे केले आहेत. परंतु, खरी लढत ही कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यातच होईल.
शहरात ८१ प्रभाग असून, सर्व प्रभागांतून कमीत कमी चार व जास्तीत जास्त १६ उमेदवार निवडणूक लढवित असल्याने या सर्वच लढती बहुरंगी होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेचे सोपान आपल्या हाती राखण्यासाठी कंबर कसली कसली आहे. त्यामुळे सर्वत्र चुरशीच्या लढती होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The retreat ended, started fighting directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.