वेतनश्रेणीप्रश्नी सेवानिवृत्त शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST2021-07-17T04:20:20+5:302021-07-17T04:20:20+5:30
जयसिंगपूर : जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे निवृत्त होऊन २४ वर्षे झाली तरी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नसल्याचा ...

वेतनश्रेणीप्रश्नी सेवानिवृत्त शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा
जयसिंगपूर : जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे निवृत्त होऊन २४ वर्षे झाली तरी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप औरवाड (ता. शिरोळ) येथील लाजम नबीसाहेब पटेल यांनी केला आहे. याप्रश्नी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पटेल यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
सन २०१५पर्यंतच्या सर्व शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली. मात्र, सर्व्हिस बुक उपलब्ध नाही, या कारणावरुन मला वेतनश्रेणी मिळाली नाही. जिल्हा परिषदेकडून सर्व्हिस बुक आणून देण्यात आले. त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करुन तो पुन्हा पाठविण्यात आला. हा प्रस्ताव दोन वर्षे जिल्हा परिषदेकडे पडून आहे. याबाबत चौकशी केली असता, तालुक्याची माहिती मागवली आहे, असे उत्तर मिळत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेदेखील याबाबतचा पाठपुरावा केला आहे. गतवर्षी कोरोनाने पत्नी व मुलाचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत जगणे कठीण बनले आहे. वेतनश्रेणीचा आधार मिळाला तर कौटुंबिक गरजा भागविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी पटेल यांनी निवेदनाव्दारे केली आहे.