देवाळे : नावली (ता. पन्हाळा) येथे घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाने मेव्हण्यावर गोळीबार केला. या घटनेत मेहूणा गंभीर जखमी झाला. विनोद पाटील असे जखमीचे नाव आहे. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नावली गावात एकच खळबळ उडाली. सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते यांनी आपले मेहूणे विनोद अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये विनोद पाटील हे जखमी झाले. जखमी विनोद यांना कोडोली येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळतात कोडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा व तपास पोलिस करीत आहेत. दरम्यानच टोप येथे ही गोळीबाराची घटना घडली होती. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला.
टोप येथील गोळीबारप्रकरणी आरोपी शेलारला पोलिस कोठडी, आठ जणांना नोटीसशिरोली : टोप (ता. हातकणंगले) येथील फेडरल बँकेसमोर झालेल्या गोळीबारप्रकरणी गणेश शेलार याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच याप्रकरणी सहभागी असलेल्या उर्वरित आठ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.गणेश शेलार, नितीन पाटील आणि विजय पोवार यांच्यात एका विषयावरून वाद झाला होता. शेलार आणि पाटील यांच्यात हा वाद चिघळत गेल्यानंतर आरोपी गणेश शेलार याने रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला. या प्रकरणी शिरोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी गणेश शेलार याला अटक केली. शेलार याला पेठ वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे शस्त्राचा खुलेआम वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.