निवृत्त प्राध्यापक संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST2020-12-06T04:26:49+5:302020-12-06T04:26:49+5:30
कोल्हापूर : नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेने पाठिंबा दिला ...

निवृत्त प्राध्यापक संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
कोल्हापूर : नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवानिवृत्त प्राध्यापक संघटनेने पाठिंबा दिला आहे. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या आंदोलनास प्रा. एस. जी. पाटील, एस. एस. मानकर, ए. पी. देसाई, टी. व्ही. स्वामी, डॉ. एस. ए. बोजगर, डॉ. आर. जी. फडतरे, डॉ. अशोक कोरडे, एन. के. मुल्ला, विलास रणसुभे, शिवाजीराव गायकवाड, अजमुद्दीन पट्टेकरी, विनोद महाजन, सुभाष जाधव, एकनाथ काटकर यांनी पाठिंबा दर्शवला. देशभरातील शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यांमुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करीत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अन्नदात्याशी केलेले हे वर्तन अमानुष असल्याने त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढे उभारल्याची आठवणही संघटनेने करून दिली आहे.