लाथाळ्यांवरच ठरणार निकाल
By Admin | Updated: October 10, 2014 23:00 IST2014-10-10T22:41:34+5:302014-10-10T23:00:10+5:30
काँग्रेसमधील नेतेच सैरभैर : ‘दक्षिणे’तील परिणाम ‘उत्तर’वर उमटणार

लाथाळ्यांवरच ठरणार निकाल
भारत चव्हाण -- कोल्हापूर --पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील निवडणुकीत चुरस वाढली असली तरी कोण निवडून येणार, हे सांगणे कठीण झाले आहे. तरीही कॉँग्रेस पक्षासमोर शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. उत्तर मतदारसंघावर ‘दक्षिणे’तील खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वीकारलेल्या राजकीय भूमिकेवर हल्लाबोल होणार, हे नक्की मानले जाते. त्यामुळेच कॉँग्रेसची रसद शिवसेनेला मिळून गतनिवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर मतदारसंघाने मागच्या २० वर्षांत शिवसेनेच्या बाजूने कौल दिला असून, शिवसैनिकांच्या उत्साहावर आजही काही परिणाम झालेला नाही. भाजपबरोबरची आघाडी तुटल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर अडचणीत येतील, त्यांना मिळणाऱ्या भाजपच्या मतदानापैकी १८ ते २० हजार मतांची घट होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु, आघाडी तुटल्यामुळे क्षीरसागरांसह त्यांचे सर्व शिवसैनिक जोरदार कामाला लागले. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका स्पष्ट केली. प्रचारसभा, पदयात्रा याद्वारे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित शिवाजीराव कदम यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली होती. त्यांना अनेक मंडळे, तालीम, संस्थांचा पाठिंबा मिळाला. प्रत्यक्षात त्यांच्या प्रचारात महापालिकेतील कॉँग्रेसच्या ३३ नगरसेवकांपैकी काही मोजकेच नगरसेवक सहभागी झाले. काही नगरसेवकांनी तर थेट विरोधाची भूमिका घेत क्षीरसागर यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, भाजपचे महेश जाधव, मनसेचे सुरेश साळोखे यांना अचानक लढावे लागत असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका पटवून देताना त्यांना घाम फुटला आहे. भाकपच्या रघुनाथ कांबळे यांचीही स्थिती जवळपास तशीच आहे. कार्यकर्त्यांना बांधून ठेवून प्रचारात सक्रिय ठेवणे हे एक मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे आर. के. पोवार काही प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असून, ते प्रचारातही दिसतात. परंतु, खासदार धनंजय महाडिक यांचे सहकार्य त्यांना मिळत नसल्याचे जाणवते.
महाडिक यांचा ओढा नातेवाईक असलेल्या सत्यजित कदमांकडे जास्त आहे. महाडिक कुटुंबाला मानणारे काही नगरसेवक अलिप्त आहेत. त्यावरूनच महाडिक यांचा पाठिंबा आर. के. पोवार यांच्याऐवजी सत्यजित कदम यांना राहील, असे अनुमान काढायला वाव आहे. ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये माजी मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक उतरल्याने महाडिक-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. ‘दक्षिणे’तील राजकारणाचे परिणाम ‘उत्तर’वर उमटणार, हे निश्चित झाले आहे. कसबा बावडा, लाईन बझार या पट्ट्यातील मतदार सतेज पाटील यांच्या आदेशाची वाट पाहात आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या क्षीरसागर यांची पाचही बोटे तुपात आहेत.
उत्तर कोल्हापूर
एकूण मतदार २,८0,७६६
प्रचारातील कळीचे मुद्दे :
शहरवासीयांवर लादलेला टोलचा मुद्दा जास्त गाजतोय. सर्वच पक्षांनी टोलमुक्त कोल्हापूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
कॉँग्रेस आघाडी सरकारने व्यापारी वर्गावर एलबीटी लादल्याचा आरोप होतोय. शिवसेनेने तो रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.
रस्ते प्रकल्पातील भ्रष्टाचार, वैयक्तिक संपत्तीवरून टीका.
‘नगरोत्थान’मधील अपूर्ण आणि खराब रस्ते.