प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल-- शिरोळ जिल्हा परिषद विश्लेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 21:31 IST2017-02-24T21:31:32+5:302017-02-24T21:31:32+5:30
‘स्वाभिमानी’ची गणिते चुकली : उल्हास पाटील यांचे पुन्हा वर्चस्व

प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल-- शिरोळ जिल्हा परिषद विश्लेषण
संदीप बावचे --- शिरोळ --कार्यकर्त्यांच्या विजयासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शिरोळ तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानीची चुकलेली गणिते, काँग्रेस-राष्ट्रवादीला गत निवडणुकी एवढेच मिळालेले यश, तर भाजप-शिवसेनेचा करिष्मा पाहावयास मिळाला. खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचे चुकलेले बेरजेचे राजकारण त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरले. तर भाजपचे अनिल यादव व शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी तालुक्यातील आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे पुन्हा एकदा निकालावरून स्पष्ट झाले.
शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात अपेक्षेप्रमाणे दोन्ही काँग्रेसनी आघाडी केली. गत निवडणुकीत मिळालेले यश व कार्यकर्त्यांच्या दबावामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेऊन निवडणूक लढविली. सुरुवातीपासूनच भाजप-शिवसेना एकत्र युती करणार, असे चित्र असतानाच छुप्या युतीतून त्यांनी विभागून जागा लढविल्या. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या बहुरंगी लढतीत स्वाभिमानीच्या शुभांगी शिंदे विजयी ठरल्या. भाजप पुरस्कृत बेबीताई भिलवडे यांच्या बंडखोरीमुळे काँगे्रसच्या सुजाता शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. स्वाभिमानीने हा मतदारसंघ कायम ठेवला.
‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने पहिल्यांदाच एंट्री केली. स्वाभिमानीच्या दीपाली ठोमके यांचा ७१८ मतांनी पराभव करीत शिवसेनेच्या स्वाती सासणे विजयी ठरल्या. याठिकाणी राष्ट्रवादीच्या स्मिता कांबळे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ठोमके यांचा पराभव सावकर मादनाईक यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. स्वाभिमानीचा दुसरा बालेकिल्ला असणाऱ्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व राखत जि.प. व पं.स.च्या दोन्ही जागा काबीज केल्या.
जयसिंगपूर नगरपालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिरोळ जिल्हा परिषदेची जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. प्रमुख तिरंगी लढतीत भाजपचे अशोकराव माने मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. अकिवाट जि. प., हेरवाड पं. स., दानोळी जि. प. निवडणुकीत यापूर्वी माने यांचा पराभव झाला होता. अखेर शिरोळमधून त्यांना विजयाचा गुलाल लागला. स्वाभिमानीच्या हक्काचा समजल्या जाणाऱ्या नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत स्वाभिमानीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेसचे शेखर पाटील व भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ असा सामना झाला. मात्र, अवघ्या सहा मतांनी निंबाळकर यांनी बाजी मारली.
काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपने काबीज केला. छाननीत हरकतीची लढाई जिंकून भाजपचे विजय भोजे यांनी आपला करिष्मा निकालातून दाखविला. दत्तवाड जि. प. मतदारसंघातून
जि. प.चे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे उमेदवार बंडा माने यांनी शिवसेनेचे संताजी घोरपडे व स्वाभिमानीचे बाळगोंडा पाटील यांचा पराभव करून एका दगडात दोन पक्षी मारले.
जि. प. व पं. स. निवडणुकीत स्वाभिमानीसह, काँग्रेस-राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण केले. तर भाजप-शिवसेनेने मताच्या विभागणीतून आपले वर्चस्व सिद्ध केले. पंचायत समितीवर कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. मतदारांनी सर्वांनाच संधी दिली असली, तरी जि. प. व पं. स. निकालानंतर आता नेत्यांसमोर विकासकामांचे आव्हान आहे.
अशी मतांची विभागणी
शिरोळ तालुक्यात जि. प. निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना ५६४४७, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना ५५२५१, तर स्वाभिमानीच्या उमेदवारांना ५१४४२ मते मिळाली.
पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना ५९९२६, स्वाभिमानी ५४४१३, तर शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना ५२५४४ मते मिळाली.
जि. प.मध्ये भाजप-शिवसेना, तर पं. स.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने पहिल्या क्रमांकाची मते घेतली.