‘आता बस्स’ मोहिमेचे फलित : ‘लोकमत’संगे पडतंय विकासाचे पाऊल; यापुढेही राहणार पाठपुरावा कायम

By Admin | Updated: July 28, 2014 00:03 IST2014-07-27T23:22:39+5:302014-07-28T00:03:54+5:30

कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्नांना गती

The result of the 'Bus Basement' campaign: 'Lokmat' is a step for development; Continued follow-up will continue | ‘आता बस्स’ मोहिमेचे फलित : ‘लोकमत’संगे पडतंय विकासाचे पाऊल; यापुढेही राहणार पाठपुरावा कायम

‘आता बस्स’ मोहिमेचे फलित : ‘लोकमत’संगे पडतंय विकासाचे पाऊल; यापुढेही राहणार पाठपुरावा कायम

कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्नांना गती
‘आता बस्स’ मोहिमेचे फलित : ‘लोकमत’संगे पडतंय विकासाचे पाऊल; यापुढेही राहणार पाठपुरावा कायम
कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचे व विकासाशी निगडित अकरा महत्त्वाचे विषय ‘लोकमत’ने जानेवारीमध्ये ‘आता बस्स्...’ या विशेष वृत्तमालिकेद्वारे मांडले. सहा महिन्यांनंतर या प्रश्नांचा लेखाजोखा घेतला असता, त्यांतील तब्बल आठ प्रश्नांवर सोडवणुकीच्या दृष्टीने ठोस पावले पडली आहेत. तीन विषयांत मात्र कोणतीच हालचाल झालेली नाही. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत ‘लोकमत’चा पाठपुरावा कायमपणे राहणार आहे.
विश्वास पाटील - कोल्हापूर
प्रश्न नागरी विकासाचे असोत, औद्योगिक अथवा पायाभूत सुविधांचे. कोल्हापूरला प्रत्येक प्रश्नासाठी संघर्ष करावा लागला, झगडावे लागले आहे. कोल्हापूरचा इतिहासही संघर्षाचाच आहे.
माजी आरोग्यमंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापूरसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले, तर आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनासाठी प्रयत्न केले, ही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास आजपर्यंत या शहराला व जिल्ह्यालाही राज्यात नेतृत्व देऊ शकेल व प्रश्न सोडवू शकेल, असे खमके नेतृत्व लाभले नाही. त्यामुळे कोल्हापूरने जो काही विकास केला, तो सगळा भांडून व वारंवार संघर्ष करूनच. हा संघर्ष आजही थांबलेला नाही व संपलेलाला नाही. टोलच्या प्रश्नावरून कोल्हापूरकर गेली चार वर्षे सातत्याने रस्त्यावर उतरून लढाई करीत आहेत. हे कोल्हापुरी माणसाच्या लढाऊपणाचे प्रतीकच.
तेजस्वी वारसा असूनही कोल्हापूरचे काही मूलभूत प्रश्न जाग्यावरून हलायला तयार नव्हते, अशा प्रश्नांची रोखठोक सद्य:स्थिती मांडण्याचे काम ‘लोकमत’ने ‘आता बस्स्...’ या वृत्तमालिकेद्वारे केले. त्यामागील भूमिकाच ही होती की आता या प्रश्नांच्या सोडवणुकीचा अंत झाला आहे. प्रश्न नेमका काय, तो सोडविण्यातील अडचण काय आहे, तो न सुटल्याने कोल्हापूरचे काय नुकसान होत आहे व तो सोडविण्यासाठी काय करावे असा रोडमॅपच
‘लोकमत’ने मांडला होता.

प्रश्न मांडतानाच अडचणींसह तो कसा सोडवला जाऊ शकतो, याचे दिशादर्शन या वृत्तमालिकेतून झाले. त्यास कोल्हापूरच्या जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही एखाद्या प्रश्नावर ‘आता बस्स...’ ही मालिका ‘लोकमत’ने सुरू करावी, असे वाचक सुचवू लागले, हेच यश म्हटले पाहिजे.
जे अकरा विषय ‘लोकमत’ने मांडले, त्यांतील महालक्ष्मी मंदिराचा विकास, चित्रनगरी आणि उद्योगक्षेत्राच्या प्रश्नांबाबत फारशी प्रगती झालेली नाही. मात्र इतर आठ विषय मार्गी लागण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

लोकमत’ उद्या (मंगळवार)पासून या प्रत्येक प्रश्नाची काय स्थिती आहे, त्यात आणखी काय व्हायला हवे याची मांडणी
‘आता बस्स..’ याच वृत्तमालिकेद्वारे करणार आहे.
-दर सहा महिन्यांला हा लेखाजोखा ‘लोकमत’ प्रश्न सुटेपर्यंत मांडत राहील. ‘लोकमत’ या नावातच लोकांच्या मतांबद्दल आदर आहे. त्याच आदरापोटी हे प्रश्न आम्ही
मांडत राहू.

महालक्ष्मी मंदिर
मंदिराचा विकास करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. दर्शन मंडप व अन्य कामांसाठी दहा कोटी रुपये राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी मंजूर केले. मात्र, मंत्रालयातच फाईल फिरत राहिली.

चित्रनगरी
चित्रनगरीची स्थिती भयाण अशीच आहे. त्याचा काही विकास करायचा आहे, हेच राज्य शासन विसरले आहे. नुसत्या घोषणा व आश्वासने यांचाच ‘ट्रेलर’ सुरू आहे. कार्यवाहीच्या पिक्चरची सध्या कोल्हापूरकरांना प्रतीक्षा आहे.

उद्योगधंद्यांचे प्रश्न
कोल्हापुरातील उद्योजकांनी वीज, कर व मूलभूत सोयींसाठी महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उद्योजकांशी चर्चा केली; परंतु हा विषय तिथेच थांबला आहे. उद्योजक आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत.
विमानतळ
कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. येत्या १५ आॅगस्टपासून सुप्रीम कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे. तसेच केंद्राच्या ‘लो कॉस्ट’ विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाल्याने येथून विमानसेवेच्या
‘टेक आॅफ’चा मार्ग सुकर झाला आहे.
हद्दवाढ
कोल्हापूर शहराची हद्दवाढ ऐरणीवर आली आहे. हद्दवाढ व्हायलाच हवी अशी ‘लोकमत’ची भूमिका आहे. परंतु हे करीत असताना ज्यांचा त्याबद्दल आक्षेप आहे, त्या ग्रामस्थांच्या भावनांनाही व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे.
सीपीआर
‘सीपीआर’ची प्रकृती सुधारावी यासाठी आग्रह धरणारी कृती समिती स्थापन झाली. तेथील कारभार सुधारला पाहिजे, असा दबावगट तयार झाला आहे. अन्य जिल्हा रुग्णालयांच्या तुलनेत ‘सीपीआर’ हे खूपच चांगल्या सेवा देणारे आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
केशवराव नाट्यगृह
केशवराव भोसले नाट्यगृहासाठी व शाहू खासबाग मैदानासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून कामे सुरू झाली आहेत. मैदानाचा विकास झपाट्याने सुरू आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम नीट होईल, यावर लक्ष देण्याची जबाबदारी ‘लोकमत’ची असेल.

रेल्वेचा प्रश्न
रेल्वेचे प्रश्न नव्या सरकारकडून काही मार्गी लागतील अशी आशा होती. त्याची सुरुवात धिम्यागतीने का सुरू झाली आहे. अर्थसंकल्पात कोल्हापूरच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. त्यामुळे त्यासाठीचा पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे.
रंकाळा विकास
रंकाळ्याचा विकासाच्या बाबतीत दोन पावले पुढे व चार पावले मागे असे होत आहे. निधी आहे परंतु त्याच्या कामाला जेवढी गती हवी ती मिळालेली नाही. परंतु रंकाळा तंदुरुस्त राहिला पाहिजे, ही कोल्हापूरची लोकभावना आहे. तोच या प्रश्नातील मोठा दबावगट आहे.
पंचगंगा प्रदूषण
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनेही काही प्रमाणात निश्चितच काम झाले आहे. महापालिकेने ७६ कोटी रुपये खर्चून ७५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. त्यातील २६ एमएलडी सांडपाण्यावर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोंडलेली वाहतूक
कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ ‘लोकमत’ने सातत्याने मांडला. त्याची दखल घेऊन वाहतूक शाखेने सतरा ठिकाणी सिग्नल बसविले. आता चौका-चौकांत वाहतूक पोलीस दिसतो. काही प्रमाणात वाहतुकीला शिस्त लागली आहे.

Web Title: The result of the 'Bus Basement' campaign: 'Lokmat' is a step for development; Continued follow-up will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.