निर्बंध लागले, भाज्यांचे दर चढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST2021-04-05T04:20:38+5:302021-04-05T04:20:38+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागण्याची घोषणा राज्य सरकारकडून झाल्यानंतर लगेचच कोल्हापूरकरांनी बाजारात धाव घेतली. तशी सकाळपासूनच गर्दी होती, ...

निर्बंध लागले, भाज्यांचे दर चढले
कोल्हापूर : लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागण्याची घोषणा राज्य सरकारकडून झाल्यानंतर लगेचच कोल्हापूरकरांनी बाजारात धाव घेतली. तशी सकाळपासूनच गर्दी होती, पण अधिकृत घोषणा झाल्यावर रस्ते गर्दीने फुलून गेले. भाजीपाल्याच्या खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडल्या. याचा लाभ उठवत विक्रेत्यांनी लगेच दरात वाढ केल्याने संकटातही लोकांना लुटण्याच्या प्रवृत्तीचे प्रत्यंतर आले.
खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. भाजीमंडई बंद राहणार असल्याने संध्याकाळी लोकांनी लक्ष्मीपुरीसह शहरातील बाजारपेठाकडे धाव घेतली. संध्याकाळी बाजार आटोपत आला की दरात घसरण होते; पण लक्ष्मीपुरी बाजारपेठेत नेमके उलटे चित्र रविवारी दिसले. निर्बंध लागल्याचा लाभ उठवत लगेचच दरात वाढ सुरू झाली. लोकांनीही नाइलाजास्तव खरेदी केली. सकाळी १५ ते २० रुपये किलो असणारा बटाटा संध्याकाळी एकदम २५ ते ३० रुपयांवर गेला. गवारी, वांगी, भेंडी यांच्या दरातही लगेच किलोमागे लगेचच ५ ते १० रुपयांची वाढ झाली. कोंथिबीर, मेथीच्या जुड्या २० रुपयांवर गेल्या.
भाजीपाल्यासह धान्य व किराणा मालाच्या दुकानासमोर गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. तोंडावर मास्क असला तरी प्रचंड गर्दी आणि रेटारेटीमुळे कोरोनाला मिठी मारण्यासारखीच परिस्थिती होती.