निर्बंधाची अंमलबजावणी करावीच लागेल : बलकवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:30+5:302021-06-28T04:17:30+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात यावर्षी तीन महिने थांबला आहात, आणखी चार दिवस थांबा, असे आवाहन व्यापाऱ्यांना करतानाच महानगरपालिका ...

निर्बंधाची अंमलबजावणी करावीच लागेल : बलकवडे
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात यावर्षी तीन महिने थांबला आहात, आणखी चार दिवस थांबा, असे आवाहन व्यापाऱ्यांना करतानाच महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शासनाच्या निर्देशानुसार जाहीर झालेल्या निर्बंधांचे आम्हाला पालन करावेच लागेल. आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल, असा इशारा रविवारी दिला.
जिल्हा प्रशासनाने पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश रविवारी दुपारी जारी केल्यानंतर तत्काळ कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे महापालिका, पोलीस आणि व्यापारी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी व्यापाऱ्यांना शासन आदेशाचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन केले आहे. इतके दिवस थांबलात, आता आणखी काही दिवस थांबा. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला असून तो या आठवड्यात आणखी खाली येईल. गुरुवारपर्यंत किती पॉझिटिव्हिटी रेट असेल त्यावर पुढील आदेश येतील. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणखी थोडा संयम दाखवावा, असे बलकवडे म्हणाल्या.
व्यापाऱ्यांना आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केले तसेच यापुढेही करतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा धोका टळलेला नाही अथवा तो कमीही झालेला नाही. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे. सामूहिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच नियमांच्या बाहेर जाऊन किंवा नियम मोडून व्यवसाय करता येणार नाही. जर असा प्रयत्न झाला तर आम्हाला नियमांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील व्यापारी पेठांवर व तेथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सहा पथके स्थापन केली असून पोलिसांचाही त्यात समावेश आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ही पथके रस्त्यावर उतरणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडली गेली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई या पथकामार्फत केली जाणार आहे. याशिवाय पोलिसांची पथकेही बाजारपेठेत कार्यरत असतील. या पथकांकडे केएमटीचे कर्मचारी देण्यात आले असून दंडाच्या पावत्या त्यांच्यामार्फत केल्या जाणार आहेत.