सुरक्षा रक्षकांना विश्रांती कक्ष

By Admin | Updated: July 27, 2015 00:04 IST2015-07-27T00:04:22+5:302015-07-27T00:04:22+5:30

शिवाजी विद्यापीठ : बिनतारी संदेश यंत्रणाही पुरविल्या

Rest room for security guards | सुरक्षा रक्षकांना विश्रांती कक्ष

सुरक्षा रक्षकांना विश्रांती कक्ष

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांसाठी विश्रांती कक्षाची सुविधा प्रशासनाने पुरविली आहे. त्यात विद्यापीठ कॅम्पस्मधील दोन निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यासह सुरक्षा अधिक चांगल्या पद्धतीने राबविता यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना बिनतारी संदेश यंत्रणा (वॉकीटॉकी) दिल्या आहेत.
संपर्क साधण्याची तोकडी यंत्रणा, अपुऱ्या सुविधा, कमी मनुष्यबळ आणि विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष नाही, अशा असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांची व्यथा ‘लोकमत’ने २० जुलैच्या अंकात ‘विद्यापीठाची सुरक्षा असुविधांच्या गर्तेत’ या वृत्ताद्वारे मांडली. त्यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत सुरक्षा रक्षकांना विद्यापीठ कॅम्पस्मधील प्राध्यापकांसाठी असलेल्या निवासस्थानांमधील दोन निवासस्थाने विश्रांती कक्षासाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात आठ खोल्या आहेत. आणखी एक निवासस्थान येत्या आठवड्याभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे, तसेच एखाद्यावेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सुमारे दीड लाख रुपयांचे पाच वॉकीटॉकीचे संच दिले आहेत.
विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, तंत्रज्ञान विभाग, प्रवेशद्वार क्रमांक एक आणि आठ याठिकाणी सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सुरक्षा विभागातील मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यात पहिला टप्पा म्हणून येत्या दोन दिवसांत नवीन १५ सुरक्षा रक्षक रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, याबाबत कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक कल्याण संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून सुविधांसाठी सुरक्षा रक्षकांचा समितीच्या माध्यमातून लढा सुरू आहे. त्याला ‘लोकमत’ने बळ देत यश मिळवून दिले.
विद्यापीठ प्रशासनाने विश्रांती कक्ष आणि वॉकीटॉकी देऊन सुरक्षा रक्षकांना सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
विश्रांती कक्ष आणि वॉकीटॉकीच्या सुविधेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांना काम करता येईल. अन्य मागण्यांची प्रशासन लवकर पूर्तता करेल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rest room for security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.