सीईटीपीकडील थकबाकी सव्वा कोटीवर
By Admin | Updated: July 12, 2014 00:43 IST2014-07-12T00:40:37+5:302014-07-12T00:43:39+5:30
इचलकरंजी : प्रकल्प केव्हाही बंद पडण्याची भीती

सीईटीपीकडील थकबाकी सव्वा कोटीवर
राजाराम पाटील - इचलकरंजी, वस्त्रोद्योगासाठी अत्यावश्यक असलेल्या औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची प्रोसेसर्स कारखानदारांकडून होणारी थकबाकी सव्वा कोटी रुपयांवर गेल्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. प्रकल्प बंद पडल्यास येथील वस्त्रोद्योगावर गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे.
शहर व परिसरात कापडावर प्रक्रिया करणारे आणि सूत व कापडाची रंगणी करणारे असे ६८ छोटे-मोठे प्रोससेर्स कारखाने आहेत. त्यामध्ये पॉवर प्रोसेसर्स १४, मध्यम पॉवर प्रोसेसर्स ६, हॅण्ड प्रोसेसर्स १८, ब्लिचिंग करणारे कारखाने १०, गॅस स्ट्रेंटर २१ व रंगणी करणारा १ अशा कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) इचलकरंजी पॉवरलूम डेव्हलपमेंट क्लस्टर योजनेतून उभारण्यात आला. सीईटीपी नसता, तर कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पातील सांडपाण्यापासून नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याच्या कारणावरून हे प्रकल्प बंद पडले असते. पर्यायाने त्याचा परिणाम वस्त्रोद्योगावर झाल्यामुळे येथील यंत्रमाग कारखानेसुद्धा बंद पडले असते.
अशा पार्श्वभमूीवर इचलकरंजी पॉवरलूम डेव्हलपमेंट क्लस्टर योजनेतून शहरात या प्रोसेसर्स कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या २२ कोटी रुपये खर्चाच्या सीईटीपीची उभारणी करण्यात आली. पहिले वर्षभर हा प्रकल्प क्लस्टरने चालवून तो नंतर प्रोसेसर्स कारखान्यांची संघटना असलेल्या वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनकडे चालविण्यास देण्यात आला. अशा प्रकारे गेली तीन वर्षे हा प्रकल्प सुरू आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी येणारा खर्च संबंधित कारखान्याच्या बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याच्या प्रमाणावर आकारण्यात येणाऱ्या ठरावीक रकमेतून चालवला जातो.
साधारणत: प्रत्येक महिन्याला ५० ते ५५ लाख रुपये जमा होतात. त्यापैकी सुमारे ४५ लाख रुपये प्रकल्पासाठी खर्च होतात. उर्वरित पैशांतून प्रकल्पासाठी असलेल्या यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्ती केली जाते. तसेच प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेली आधुनिक यंत्रणाही उभारणीसाठी यातून पैसे वापरले जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बड्या प्रोसेसर्स कारखान्यांनी आपली महिन्याची रक्कम थकविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रकल्प चालविण्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासू लागली आहे. तीन बड्या प्रोसेसर्सकडे ६३ लाख रुपये, हॅण्ड प्रोसेसर्सकडे २७ लाख रुपये, ब्लिचिंग कारखान्यांकडे ८ लाख रुपये व गॅस स्ट्रेंटरकडे १० लाख रुपये अशी एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम थकीत राहिली असून, चालू थकबाकीसुद्धा सुमारे ४० लाख रुपये असल्याची माहिती या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका संचालकाकडून सांगण्यात आली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प अडचणीत आला आहे. प्रकल्प बंद पडल्यास त्याचा परिणाम शहरातील वस्त्रोद्योगावर होऊन टप्प्याटप्प्याने यंत्रमाग कारखानेही बंद पडू लागतील, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
-शहरातील दिग्गज राजकीय नेतेमंडळींच्या छायेखाली सुरू असलेल्या तीन प्रोसेसर्स कारखान्यांकडेच ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. ‘यश’ घेऊन किर्तीमान झालेला, ‘दक्षिण’ असे नाव सांगत शहराच्या उत्तरेकडे असलेला आणि महाराणींच्या नावाचा उल्लेख असलेला अशा तीन प्रोसेसर्सकडे असलेल्या रकमेमुळे ‘सीईटीपी’ चालविणारे संचालक मेटाकुटीला आले आहेत. राजकीय नेत्यांच्या छत्रामुळे या तिन्ही प्रोसेसर्सवर कडक कारवाई करता येत नाही आणि त्यांच्याकडील थकबाकीने आता वीज बिल भरण्यासही पैसे नाहीत, अशी केविलवाणी अवस्था सीईटीपीची झाली आहे.