दर्जेदार रस्त्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांची
By Admin | Updated: November 13, 2014 00:01 IST2014-11-12T23:47:20+5:302014-11-13T00:01:01+5:30
नेत्रदीप सरनोबत : कामांत हलगर्जीपणा केल्यास ‘गय’ नाही, अडथळा आणल्यास फौजदारी

दर्जेदार रस्त्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांची
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आता १५०हून अधिक रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी हाती घेतली आहे. नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची बांधणी दर्जेदार करण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच असेल; मात्र या रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आहे. रस्ते कामांत हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद आज, बुधवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिकेतील अभियंत्यांच्या बैठकीत दिली.
नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने यापूर्वीच घेतला आहे. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. सर्व्हे, गळती काढणे, टेस्ट रिपोर्ट, आदी तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे.
शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. तसेच इतर लहान-मोठे १५०हून अधिक रस्ते करण्यात येणार आहेत. कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर थेट फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या
आता वेळेत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे दिव्य प्रशासनाला करावे लागणार आहे. नागरिकांच्या तगाद्यामुळे प्रशासनानेही दर्जेदार रस्त्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.
शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनानेही रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्व कनिष्ठ व उपअभियंत्यांना रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवून दर दोन दिवसांनी अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. इतके करूनही रस्ता खराब झाल्यास किंवा नागरिकांची तक्रार आल्यास खराब रस्त्यांसाठी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे.
- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)