पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलू
By Admin | Updated: November 13, 2014 23:41 IST2014-11-13T23:40:49+5:302014-11-13T23:41:57+5:30
शशिकांत शिंदे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य पक्षप्रतोदपदी निवड

पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलू
सातारा : ‘आजपर्यंत मी पक्षासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अजित पवार यांनी विधानसभेतील पक्षप्रतोदपदी निवड केली असून, दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलून पक्षाची भूमिका या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणार आहे,’ अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१९९९ मध्ये आमदार शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला. जावळीमध्ये सलग दहा वर्षे आमदार राहिल्यानंतर २००९ मध्ये त्यांनी माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून मताधिक्याने विजय खेचून आणला. कामकाजाचा अनुभव, पक्षाच्या ध्येयधोरणाची बाजू मांडण्यासाठी प्रभावी वक्तृत्व, आक्रमकपणा या गुणांमुळे त्यांनी पक्षप्रतोदपद यापूर्वी सांभाळले आहे. यानंतर २०१३ मध्ये त्यांची राज्याच्या जलसंपदामंत्री निवड झाली. २०१४ मध्ये पुन्हा त्यांनी ४७ हजार ९६६ मतांनी विजय मिळविला.
राष्ट्रवादीने विधानसभेत भाजप सरकाला पाठिंबा दर्शविला तरी विधानसभेत राष्ट्रवादीची भूमिका अजित पवार ठरवणार आहेत. राष्ट्रवादीची भूमिका माध्यमांसह जनतेसमोर मांडण्यासाठी आमदार शिंदे यांची पक्षाने केलेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षनेतेपदी अजित पवार, गटनेतेपदी आर. आर. पाटील, उपनेतेपदी जयदत्त क्षीरसागर, मुख्य पक्षप्रतोदपदी शशिकांत शिंदे व प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले आहे. (प्रतिनिधी)