सहा ते अकरा मे असा सहा दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेसरी हे गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तिन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून आसपासच्या सुमारे तीसहून अधिक खेड्यातील नागरिक हे नेसरी येथे व्यापार, शिक्षण व वैद्यकीय कारणासह शासकीय कामांसाठी येत असतात. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात बळावत असल्यामुळे नेसरीच्या आसपास गावामध्येही स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित नागरिक हे खरेदीसाठी नेसरी बाजारपेठेत मोठी गर्दी करताना दिसत होते. तसेच नेसरी येथेही काही जणांना संसर्गाची लागण झाल्याने धोका वाढू लागला होता.
अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून नेसरी ग्रामपंचायत व व्यापारी संघटनेच्या समन्वयाने गुरुवार दिनांक ६ ते ११ मे असा जनता कर्फ्यू पुकारला आहे. आजच्या पहिल्या दिवशी जनता व व्यापाऱ्यांनी या स्थानिक कर्फ्यूला प्रतिसाद दिला. मेडिकल व्यतिरिक्त अन्य व्यवहार बंद होते. तर पोलीस प्रशासन ये जा करणाऱ्यांची कसून चौकशी करत होते. दिवसभर सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
फोटो ओळी
नेसरी येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद.
नेहमी गजबजलेल्या नेसरी बसस्थानक परिसरात असा शुकशुकाट होता.