इचलकरंजी : येथील सखी मंचच्यावतीने आयोजित ‘खमंग दिवाळी’ या दिवाळीचे पदार्थ तयार करण्याच्या प्रात्यक्षिक शिबिराला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणावेळी तयार करण्यात आलेल्या चटकदार पदार्थांची लज्जत उपस्थित सखी सदस्यांनी अनुभवली.येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये आयोजित प्रशिक्षण वर्गाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनल करून करण्यात आली. यावेळी प्रशिक्षिका मंदा आचार्य, रोटरी अॅन्स क्लबच्या अध्यक्षा उमा दाते, वैशाली बुचडे, आदी प्रमुख उपस्थित होते. रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी आणि अॅन्स क्लबच्या सहप्रायोजकाने घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात दिवाळी सणामध्ये तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांची सोपी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये मलई बर्फी, गुलकंद करंजी, मिक्समेड लाडू, नमकीन चंपाकळी, चोळा फट्टी, पालक शेव असे विविध पदार्थ अतिशय सोप्या व सुलभ पद्धतीने तयार करून दाखविण्यात आले. यासह अन्य पदार्थांची रेसिपीही सखींना सांगण्यात आली. पाककलातज्ज्ञ मंदा आचार्य यांनी रुचकर पदार्थ सोप्या पद्धतीने कसे बनवावेत, याचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणावेळी तयार झालेल्या पदार्थांची चवही लज्जतदार होती. कार्यक्रमासाठी नेहा पाटील, साक्षी पाटील, बिना कालेकर, स्मिता मुथा, वैशाली डोंगळे व विनया विटेकरी यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
'खमंग दिवाळी'ला प्रतिसाद
By admin | Updated: October 15, 2014 00:29 IST