विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीचा झाला ठराव
By Admin | Updated: July 18, 2014 00:51 IST2014-07-18T00:46:11+5:302014-07-18T00:51:14+5:30
आजरा पंचायत सभा : ग्रामसेवकांकडून पैसे घेत असल्याचा जाहीर आरोप

विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीचा झाला ठराव
आजरा : आजरा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी ग्रामसेवकांकडून पैसे घेत असल्याचे पुराव्यांनिशी आपण सिद्ध करू शकतो, असा आरोप सभापती अनिता नाईक यांनी करत तालुका पंचायत अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.
आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनिता नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीस आजरा साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य विष्णुपंत केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी स्वागत केले.
विविध खात्यांचा आढावा घेताना तालुका पंचायत अधिकारी किरण खटावकर यांच्या कारभाराचा प्रश्न सभापती नाईक यांनी उपस्थित केला. खटावकर हे काही ग्रामसेवकांकडून पैसे घेतात, अशी ग्रामसेवकांची तक्रार असून, त्याबाबतचे पुरावे ग्रामसेवकांनी आपल्याकडे दिले आहेत ही बाब गंभीर आहे, असे सुनावले. तर याचवेळी इतर सदस्यांनी खटावकर यांच्या बदलीचा ठराव मांडला.
सभेमध्ये एखाद्या अधिकाऱ्यांबाबत सभापतींनी पुराव्यानिशी आरोप करणे हे गंभीर असून, इतर अधिकाऱ्यांनीही आपली वागणूक सुधारावी, असे सदस्य विष्णुपंत केसरकर यांनी सांगितले. ग्रामसेवकांबाबत अनेक तक्रारी असताना त्यांच्यावर अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्नही केसरकर यांनी उपस्थित केला.
सदस्या कामिना पाटील यांनी शतकोटी वृक्ष लागवडीचा प्रश्न उपस्थित केला. कोवाडे येथील पाणलोट अंतर्गत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या दर्जाचा प्रश्न उपसभापती तुळशिराम कांबळे यांनी उपस्थित केला. सदर बांधकामासाठी नदीचीच वाळू वापरली असल्याचेही कांबळे यांनी स्पष्ट केले.
वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील १७५ पोल बदलण्यात येणार असल्याचे सिकनिस यांनी सांगितले. चर्चेत सदस्य दीपक देसाई, निर्मला व्हनबट्टे यांनी भाग घेतला. उपसभापती तुळशिराम कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)