हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव सभागृहात मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:14+5:302021-04-27T04:24:14+5:30
हातकणंगले पंचायत समितीची २३ एप्रिल रोजी मासिक सभा पार पडली. या सभेला १७ सदस्य हजर होते तर ५ सद्स्यांनी ...

हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव सभागृहात मंजूर
हातकणंगले पंचायत समितीची २३ एप्रिल रोजी मासिक सभा पार पडली. या सभेला १७ सदस्य हजर होते तर ५ सद्स्यांनी व्ही. सी. द्वारे उपस्थिती लावली. तालुक्यामध्ये ग्रामीण विकास कार्यक्रमानुसार बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेअंतर्गत कुंभोज, संभापूर, तळंदगे या तीन गावांसाठी प्रत्येकी १८ लाखांचा निधी ग्रामपंचायत इमारत बांधकामसाठी मंजूर झाला आहे. इमारत बांधकामाच्या निविदा ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण कराव्यात असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले असताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी इमारत बांधकाम निविदा आपल्या स्तरावर राबवून ई-निविदा मॅनेज करून आपल्या मर्जीतील ठेकेदार निवडून या ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय मान्यता आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीना बाजूला करून स्वत: चुकीची प्रक्रिया राबविल्याचा ठपका सभागृहामध्ये त्यांच्यावर ठेवण्यात आला.
पशुसंवर्धन विभागाकडून दोन दुभती जनावरे आणि दहा शेळ्या आणि एक बोकड खरेदीसाठी १०० लाभार्थी निवड करण्यासाठी लाभार्थीकडून प्रस्ताव मागणी केले होते. एका रुकडी गावातील ३८ लाभार्थी आणि इतर गावातून एंजटाकडून आलेले प्रस्ताव मंजूर केले. लाभार्थी प्रशिक्षणावर १ लाख ८४ हजार चहा, नाष्टा यासाठी खर्च केले. या प्रशिक्षणासाठी पंचायत समिती कडील पदाधिकारी किंवा सदस्य हजर ठेवले नाहीत. प्रती लाभार्थी एक लाखाच्या या योजनेत लाखो रुपयांचा ठपला पाडल्याचा आरोप सद्स्यांनी गटविकास अधिकारी यांच्यावर करून त्यांच्या बदलीचा ठराव सभागृहात मांडला तो सर्व २२ सद्स्यांनी मंजूर केला.