विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात ‘हलकर्णी’च्या समावेशाचा ठराव
By Admin | Updated: November 30, 2014 23:57 IST2014-11-30T23:53:24+5:302014-11-30T23:57:36+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : विद्यार्थ्यांची पदवी शिक्षणासाठी पायपीट

विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात ‘हलकर्णी’च्या समावेशाचा ठराव
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाच्या सोयीसाठी हलकर्णीत वरिष्ठ महाविद्यालय मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात हलकर्णीचा समावेश करण्यात यावा, असा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.
‘लोकमत’ने २० नोव्हेंबरच्या अंकात ‘पदवी शिक्षणासाठी दररोज ८० किलोमीटरचा प्रवास’ या मथळ्याखालील बातमीत गडहिंग्लजच्या पूर्वभागातील विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाची व्यथा मांडली होती. या बातमीच्या कात्रणासह त्याचा संदर्भ देत पंचायत समितीचे सदस्य बाळेश नाईक यांनी याप्रश्नी सभागृहात चर्चा घडवून आणली. अध्यक्षस्थानी सभापती अनुसया सुतार होत्या.
नाईक म्हणाले, बृहत् आराखड्यात हलकर्णीचा समावेश नसल्याने हलकर्णीला वरिष्ठ महाविद्यालय मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्वभागातील सुमारे २३ खेड्यांतील विद्यार्थ्यांना दररोज पदवी शिक्षणासाठी गडहिंग्लजला यावे लागते.
यामुळे आर्थिक भुर्दंडाबरोबरच त्यांचा वेळेचाही अपव्यय होत आहे. अनेक मुली पदवी शिक्षणापासून वंचित राहात आहेत.
त्यामुळे मूलभूत शैक्षणिक गरज म्हणून हलकर्णी येथे वरिष्ठ महाविद्यालय मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात हलकर्णीचा समावेश होणे आवश्यक आहे. त्याबाबतचा ठराव राज्यपाल तथा कुलपती, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्याकडे पाठवावा, अशी सूचना नाईक यांनी मांडली. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी हा ठराव संबंधितांना पाठविला जाईल, असे सांगितले.
यावेळी उपसभापती तानाजी कांबळे, साहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे यांच्यासह सर्व सदस्य, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)