आयआरबी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या जाहीर झालेल्या निकालपत्राचे पडसाद
By Admin | Updated: November 28, 2014 00:03 IST2014-11-27T23:49:07+5:302014-11-28T00:03:12+5:30
प्रशासनाची तक्रार यावरून सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

आयआरबी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या जाहीर झालेल्या निकालपत्राचे पडसाद
कोल्हापूर : आयआरबी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या जाहीर झालेल्या निकालपत्राचे पडसाद उद्या, शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. टोलप्रश्नी यापुढे महापालिका न्यायालयीन लढ्यात कशा प्रकारे पाऊल उचलणार याबाबत सभेत चर्चा होणार आहे. शाळांचे खासगीकरण व नगरसेविका सरस्वती पोवार यांच्याविरोधात अवैध बांधकामाबाबत प्रशासनाची तक्रार यावरून सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या निर्णयाची सभागृहास माहिती देणे, नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी सभागृहाची मान्यता घेणे, आदी विषयांवर चर्चा व शिक्कामोर्तब झाले होते. महापालिकेच्या सात शाळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावर या सभेत निर्णय अपेक्षित आहे. या सभेत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सात शाळा ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’(पीपीपी) या धर्तीवर विकसित केल्या जाणार आहेत. अण्णा भाऊ साठे मातंग विद्यालय (राजारामपुरी), रंगराव साळोखे विद्यालय (ससूरबाग), महाराणी ताराराणी विद्यालय (मंगळवार पेठ), पद्माराजे विद्यालय मुले व मुलींची शाळा (शुक्रवार पेठ), मुलींची शाळा नं. ५ (शाहूपुरी), नेहरू कन्याशाळा (रविवार पेठ) या शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
नगरसेवकपदाचा गैरवापर करून अवैध बांधकाम केल्याबद्दलचा सरस्वती पोवार यांच्या अहवालाबाबत निर्णय सभेत होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यास अवैध बांधकामप्रकरणी पोवार यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. प्रस्ताव अमान्य केल्यास अवैध बांधकामास खतपाणी घालण्याचा आरोप होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी सभागृहात कोणता निर्णय होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)