उचगावात दारू दुकाने, बीअर शॉपी बंद करण्याचा ठराव
By Admin | Updated: August 18, 2015 23:55 IST2015-08-18T23:55:41+5:302015-08-18T23:55:41+5:30
ग्रामसभा : आक्रमक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांवर पदाधिकारी, सदस्यांना धरले धारेवर

उचगावात दारू दुकाने, बीअर शॉपी बंद करण्याचा ठराव
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामस्थांच्या सनदद्वारे गावातील देशी दारू दुकान, चार बीअर शॉपी, व्हिडिओ गेम बंद करण्याचा ठराव करण्यात आला. या देशी दारू, बीअर शॉपीला परवानगी देताना ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होऊन सरपंच, ग्रामसेवक, १७ सदस्यांना धारेवर धरण्यात आले. ही दारू दुकाने त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामसभेला पहिल्यांदाच लोकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद नोंदविला. गावातील कचरा विल्हेवाट, चेतन मोटर्सजवळील कॉलनीचा रस्ता, भाजी मंडई, दलित वस्तीतील प्रवेशद्वार व समाज मंदिराचे नव्याने बांधकाम व्हावे, १८ अंगणवाड्यांचे बांधकाम व्हावे, एम.एस.ई.बी.च्या अधिकाऱ्यांना वाढीव बिलाबद्दल धारेवर धरले. मणेर मळ्यातील दुर्लक्षित रस्ता, बंधाऱ्याची डागडुजी, गाव तलावाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायत कर्मचारी भरती, मटण मार्केटमधील गाळे-खोकी धारकांकडून वार्षिक कर आकारणी, चुना भट्टीतील निघणाऱ्या धुराच्या प्रश्नावर चर्चा झाली. जुन्या अंगणवाड्या पाडण्यात आल्या आहेत; पण निधी अभावी बांधकाम होत नसल्याने ग्रामस्थांनी निधी व जागा उपलब्ध होत नसेल, तर अंगणवाड्या पाडल्या का, असा सवाल उपस्थित केला. घरातील विद्युत रिडिंग मिटरचा फोटो घेण्याऐवजी बंद दरवाजाचा फोटो लाईट बिलावर येतो, मग ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले ते काय काम करतात. त्यामुळे लाईट बील जादा येते, अशा तक्रारी जास्त होत्या. मणेर मळ्यातील रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याला तातडीने मंजुरी द्यावी, ग्रामपंचायतीच्या मोकळ््या जागांना कुंपण घालावे अशी मागणी करण्यात आली.
दुपारी दोनला चालू झालेली ग्रामसभा सायंकाळी ७.३० पर्यंत चालू राहिली. यामुळे गावातील विविध प्रश्न आक्रमकपणे मांडण्यात आले. ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. ( वार्ताहर )
ग्रामसभेतील महत्त्वाचे मुद्दे
गावातील सर्व व्हिडीओ गेम पार्लर बंद करणे.
चार ग्रामसभा घेण्याविषयी लोकांचा आग्रह, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, २ आॅक्टोबर, १ मे कामगारदिन या दिवशी ग्रामसभा घ्याव्यात.
महिला सरपंच असूनही गावठी दारूबंदीसाठी पुढाकार का नाही, ग्रामस्थांचा सवाल
५० हजार लोकसंख्या तरीही सुविधांची वाणवा
दीडकोटी ग्रामपंचायत इमारत बांधकामास मंजुरी, पण फक्त पायाभरणीसाठी २५ लाख रुपये खर्चावर ग्रामस्थांची नाराजी