महापौरांना हटविण्याच्या शिफारसीचा सभेत करणार ठराव
By Admin | Updated: March 15, 2015 00:43 IST2015-03-15T00:37:04+5:302015-03-15T00:43:35+5:30
राज्य सरकारकडे कारवाईकरिता पाठविण्यात येणार

महापौरांना हटविण्याच्या शिफारसीचा सभेत करणार ठराव
कोल्हापूर : खासगी स्वीय सहायकामार्फत लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप असलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना महपौरपदावरून हटविण्यात यावे, अशी शिफारस राज्य सरकारकडे करण्याचा निर्णय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला आहे. उद्या, सोमवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत तसा ठराव करून, तो राज्य सरकारकडे कारवाईकरिता पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर विरुद्ध नगरसेवक यांच्यातील संघर्षाने आता वेगळे वळण घेतले आहे.
महापौर माळवी यांनी पदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्यावर वेगवेळ्या प्रकारे नगरसेवकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या अद्याप बधलेल्या नाहीत. त्यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु महापौरांनी बोलाविलेली सभा एकदा कोरमअभावी तहकूब झाली की ती दुसऱ्यावेळी कोरमशिवाय घेता येते हे स्पष्ट झाल्यामुळे नगरसेवक हवालदिल झाले. मग त्यांनी महापौरांच्या विरोधातच विशेष सभा बोलाविण्याची एकदा नाही, तर दोनवेळा मागणी केली. या मागणीतील हवा काढून टाकण्यासाठी माळवी यांनी आता उद्या नियमित सर्वसाधारण सभा बोलविली आहे.
महापौरांनी दिलेल्या शहाला काटशह देण्याच्या हेतूने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी उद्याच्या सभेत महापौरांच्या विरोधात दोन ठराव दिले आहेत.
माळवी यांनी महापौरपदावर असताना लाच स्वीकारल्यामुळे महापौरपदाचे नैतिक अध:पतन झाले असून, त्यांना या पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ठरावात करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १३(१) (अ) व (ब) तसेच कलम १० (१-१अ) मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. हे दोन ठराव उद्याच्या सभेत मंजूर केले जातील, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)