सरकारी पुजारीच नेमण्याचा होणार ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:06 IST2017-07-19T01:06:01+5:302017-07-19T01:06:29+5:30
महापालिका सभा : अजेंड्यावर विषय

सरकारी पुजारीच नेमण्याचा होणार ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटवून त्या ठिकाणी शासननियुक्त पुजारी नेमण्यात यावेत, असा ठराव उद्या, गुरुवारी होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. ‘सर्वपक्षीय पुजारी हटाव समिती’ने तशी मागणी महापौर हसिना फरास यांच्याकडे केली होती; तिची दखल घेत हा ठराव गुरुवारी होणाऱ्या सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरात सध्या अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटवावेत, या मागणीसाठी लोक आंदोलन उभे राहिले आहे. नुकताच जिल्हा परिषदेच्या सभेत हक्कदार पुजाऱ्यांना हटवून तेथे शासननियुक्त पुजारी नेमण्यात यावेत, असा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. याच पद्धतीने तो महानगरपालिकेच्या सभेतही व्हावा, अशी विनंती पुजारी हटाओ समितीने महापौरांना भेटून केली होती. त्यानुसार महापालिकेच्या गुरुवारी होणाऱ्या सभेत हा ठराव केला जाणार आहे.
शैक्षणिक संस्थेला जागा?
मंगळवार पेठेतील ६२४ बी मधील महानगरपालिकेच्या मालकीची २००० स्क्वेअर फुटांची जागा हिंद एज्युकेशन सोसायटीला शाळा इमारत बांधण्यासाठी नाममात्र एक रुपया भाड्याने वीस वर्षे कराराने देण्याचा सदस्य ठरावही सभेत येणार आहे. शहरातील दिव्यांगांना केबिन वाटप करण्यात येत असून, काही दिव्यांगांनी जागा बदलून मागितली असल्याने त्यावरही उद्या, गुरुवारच्या सभेत निर्णय अपेक्षित आहे.
स्टुडिओच्या जागेवर बांधकाम नको
शहरातील शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओ यांच्या सध्या शिल्लक असणाऱ्या मोकळ्या जागेवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामास तसेच इतर व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये, असा सदस्य ठराव महासभेसमोर आला आहे. जुन्या काळातील अभिनेत्री असलेल्या नगरसेविका सुरेखा शहा यांनी हा ठराव मांडला आहे. कोल्हापूरची अस्मिता, कलानगरीचा नावलौकिक अजरामर, तसेच ऐतिहासिक ठेवा कायम राहावा, अशी अपेक्षा नगरसेविका शहा यांनी व्यक्त केली आहे.