धर्मांतराच्या स्वातंत्र्याचा कायदा करण्याचा ठराव
By Admin | Updated: December 29, 2014 00:09 IST2014-12-28T23:56:29+5:302014-12-29T00:09:46+5:30
‘श्रमुद’चे राज्यस्तरीय अधिवेशन : महात्मा फुले व्हिजन हे ‘महाराष्ट्र’ व्हिजन’

धर्मांतराच्या स्वातंत्र्याचा कायदा करण्याचा ठराव
आजरा : जो धर्म आपणाला योग्य वाटतो तो धर्म स्वीकारण्याचे खुले स्वातंत्र्य जनतेला देणारा देशव्यापी कायदा करावा आणि धर्मांतरात अडथळा आणणारे अनेक राज्यांचे कायदे रद्द करावेत. महात्मा फुले व्हिजन हे ‘महाराष्ट्र व्हिजन’ असावे, अशा मागणीचे ठराव करीत गेले तीन दिवस चित्रानगर आजरा येथील श्रमिक मुक्ती दलाच्या १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.
ज्या-ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्याचा आणि शोषणमुक्तीचा दरवाजा खुला होण्याची संधी मिळेल, असे वाटते असा धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य जनतेला मिळावे. विकासाचे व्हिजन मंत्रालयातून किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या केंद्रातून किंवा नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ठरू शकत नाही.
जनतेने तयार केलेला ‘महात्मा फुले व्हिजन आराखडा मान्य करा, नाहीतर सत्ता सोडा’, अशी घोषणा घेऊन महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.
आज, रविवारी समारोपाच्या दिवशीच्या सत्रामध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या युवा आघाडी असलेल्या ‘श्रमिक मुक्तीवादी युवा संघटनेने’ पुढाकार घेऊन राज्यव्यापी मेळावा, पर्यायी संस्कृतीच्या निर्माणाचे वादळी आंदोलन करण्यासाठी पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर संघटन करण्याचा ठरावही करण्यात आला.
८ मार्च २०१५ रोजी स्त्रियांचा राज्यव्यापी मेळावा संघटित करून स्त्रियांना विकासाच्या पर्यायी प्रक्रियेत समान संधीसाठी आणि अत्याचारांना आळा घालण्याचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी ‘श्रमुद’च्या कार्यकर्त्यांनी अमेरिकेत कृष्णधर्मीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचा व अत्याचाराचा निषेध नोंदविला.
यावेळी डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाहरू सोनवणे, दिलीप पाटील, मोहन अनपट, डॉ. प्रशांत पन्हाळकर, सुखदेव बन, डॉ. गेल अॅम्व्हेट, इंदुताई पाटणकर, मुक्ती साधना, कॉ. संपत देसाई, अॅड. कृष्णा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)