आलाबादमध्ये भूसंपादनास विरोध
By Admin | Updated: January 21, 2015 23:57 IST2015-01-21T23:35:08+5:302015-01-21T23:57:53+5:30
शेतकऱ्यांत चकमक : झुलपेवाडीचे पाणी अडवणार : प्रकल्पग्रस्त

आलाबादमध्ये भूसंपादनास विरोध
सेनापती कापशी : बारवे-दिंडेवाडी प्रकल्पानुसार जमिनीचा कब्जा घेण्यासाठी आलाबाद (ता. कागल) येथे आले असता प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासमोरच शाब्दिक चकमक झाली. यातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला.
२००० सालापासून दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेव्हापासून जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज, बुधवारी आलाबाद (ता. कागल) येथे प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा कब्जा देण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी आले असता आलाबाद येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. यातील काही शेतकरी भूसंपादनाच्या विरोधात हायकोर्टात गेले असल्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत थांबावे लागणार आहे.
दरम्यान, सूर्यवंशी गटनंबरप्रमाणे सुनावणी करत असताना अचानक प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्यात सकाळपासून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रूपांतर झाले.
आम्ही जमिनी दिल्या म्हणून प्रकल्प होत आहे, असे असताना आम्हालाच जर मारहाण होणार असेल, तर दिंडेवाडी-बारवे प्रकल्पच रद्द करा व आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, अन्यथा येत्या काही दिवसांत चिकोत्रा प्रकल्पातील पाणी अडविण्याचा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.
दरम्यान, आलाबाद (ता. कागल) येथील शेतकऱ्यांनीही बेकायदा जमीन संपादन थांबविण्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना जमिनी या द्याव्या लागतील. आलाबाद (ता. कागल) येथील बरेच शेतकरी कोर्टात गेले आहेत.
त्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत व स्टेआॅर्डर असल्यामुळे निकालानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत जे शेतकरी स्वखुशीने कब्जा देण्यास तयार आहेत. त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.