नगरसेवकाच्या अरेरावीने आरोग्य अधिकाऱ्यांचा राजीनामा

By Admin | Updated: February 24, 2015 00:45 IST2015-02-24T00:43:55+5:302015-02-24T00:45:22+5:30

पंचगंगा घाटावरील प्रकार : प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईस विरोध

Resignation of health officials by the insult of corporator | नगरसेवकाच्या अरेरावीने आरोग्य अधिकाऱ्यांचा राजीनामा

नगरसेवकाच्या अरेरावीने आरोग्य अधिकाऱ्यांचा राजीनामा

कोल्हापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असलेल्या घटकांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा घाटावर मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील नदीपात्रात जनावरे व धुणी धुणाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावत असताना एका नगरसेवकाने त्यांना अटकाव केला. ‘अरे-तुरे’ची भाषा करीत अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. या प्रकाराने व्यथित झालेल्या डॉ. पाटील यांनी तडकाफडकी आयुक्तांकडे राजीनामा सादर करून सेवामुक्त करण्याची विनंती केली. आयुक्तांनी रविवारी पंचगंगा घाट, राजाराम बंधाऱ्यासह रंकाळा परिसराची पाहणी केली होती. नदीत व रंकाळ्यामध्ये सर्रास जनावरे व धुणी धुण्याचा प्रकार सुरू असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोग्य विभागाने अशा घटकांवर कारवाई करण्याचे संकेत जाहीर निविदेद्वारे दिले. सोमवारपासून प्रत्यक्ष नोटिसा बजावण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली.
नदीपात्रात धुणी व जनावरे धुणाऱ्यांना नोटिसा बजावण्यासाठी डॉ. दिलीप पाटील पंचगंगा घाटावर पोहोचले. नागरिकांनी धुणे न धुण्याबाबत आवाहन केले. कर्मचाऱ्यांनी धुणी धुणाऱ्यांना अटकाव करताच एकच गोंधळ उडाला. यानंतर या ठिकाणी एक नगरसेवक आले, त्यांनी डॉ. पाटील यांना धुणी व जनावरे धुण्याची पर्यायी व्यवस्था करा, मगच कारवाई करा, असे बजावले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. शहरातील कचऱ्यासह अनेक बाबतीत न्यायालयाचे आदेश आहेत त्यावेळी नागरी हिताची पायमल्ली का करता, असा सवाल करीत नगरसेवकाने पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. झालेल्या ‘अरे-तुरे’ने व्यथित झालेल्या डॉ. पाटील यांनी आयुक्तांकडे राजीनामा सादर केला.

Web Title: Resignation of health officials by the insult of corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.