राजीनामा देणार; राजकारण सोडणार नाही
By Admin | Updated: July 20, 2014 22:16 IST2014-07-20T21:53:06+5:302014-07-20T22:16:49+5:30
नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

राजीनामा देणार; राजकारण सोडणार नाही
नारायण राणे : वेंगुर्ले येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादनवेंगुर्ले : काँग्रेस पक्षाने मला मुख्यमंत्री पद देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. कोकणातील लोकांनी मी गेली २५ वर्षे त्यांच्यासाठी काम करूनही मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली नाही. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मात्र राजकारण सोडणार नाही, असे उद्गार पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी राणे शुक्रवारपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता शनिवारी सायंकाळी उशिरा वेंगुर्ले येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनिष दळवी, शहर अध्यक्ष यशवंत परब, संदेश निकम, वसंत तांडेल, विष्णूदास कुबल, चंदू राणे, नीलेश चमणकर आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ३० जून २००५ मध्ये मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसने मला सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ९ वर्षात चारवेळा मुख्यमंत्री करतो असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मात्र आतापर्यंत मला मुख्यमंत्री केले नाही. माझे समर्थक असलेल्या आमदारांनाही मंत्रीपद दिले नाही.काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही व ज्या कोकणला मी २५ वर्षात भरभरून दिले त्याच कोकणातील लोकांनी माझ्या मुलाचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला. याच गोष्टीमुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असलो तरी राजकारणातच राहून काम करणार आहे. माझ्या बाबतीत घडले ते भविष्यात कुणाच्याही बाबतीत घडू नये यासाठीच मी हा निर्णय घेतला असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. तालुकाध्यक्ष मनिष दळवी यांनी राणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ठाम राहणार असून सर्व कार्यकर्ते राणे यांना साथ देतील असे सांगितले.
डॉ. कुलकर्णी यांनी राणे यांच्यावर काँग्रेस पक्षाने
कसा अन्याय केला ते यावेळी सांगितले. (वार्ताहर)
मुलाच्या पराभवास कार्यकर्ते जबाबदार: राणे
सतरा हा मला शुभ अंक आहे. आणि हाच अंक वेंगुर्लेत मला अशुभ ठरावा हे माझे दुर्दैव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझा मुलगा नीलेश वेंगुर्ले तालुक्यात १७ हजार मतांनी पिछाडीवर पडला. त्यास येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदार आहेत, असे राणे म्हणाले.