महालक्ष्मी एक्सप्रेसचे आरक्षण आजपासून सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:00+5:302021-01-24T04:11:00+5:30
कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे मध्य रेल्वेची कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या दहा महिन्यांपासून बंद होती. आता ही ...

महालक्ष्मी एक्सप्रेसचे आरक्षण आजपासून सुरु होणार
कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे मध्य रेल्वेची कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या दहा महिन्यांपासून बंद होती. आता ही गाडी १ फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरु होणार आहे. या गाडीचे आरक्षण आज, रविवार (दि. २४)पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सुत्रांनी दिली.
कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि व्यापारी, सर्वसामान्यांना परवडणारी गाडी म्हणून महालक्ष्मी एक्सप्रेसकडे पाहिले जाते. कोरोना महामारीत कोल्हापुरातून मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, बंगलोर, आदी ठिकाणी सुटणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी कोयना ही कोल्हापूर ते मुंबई आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरु केली. त्यानंतर आता १ फेब्रुवारीपासून महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे रुळावर येणार आहेत. याबाबतची घोषणा शनिवारी रात्री मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार या रेल्वे गाडीची अधिसूचना कोल्हापूर रेल्वे स्थानकाला प्राप्त झाली असून, आज (रविवार)पासून या रेल्वेचे आरक्षण सुरु होणार आहे. या गाडीने आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सुत्रांनी दिली.