सुरेखा नाईक या हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांच्या पतीचे ५ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरी कर्ता पुरूष नाही. कुटुंबात एक दिव्यांग मुलगा, दोन मुली आणि वयोवृद्ध सासू आहे. सर्वांची जबाबदारी सुरेखा यांच्यावरच आहे. परंतु, आजारपणामुळे त्यांनाही फारसी मोलमजुरी करता येत नाही. अशातच कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे गडहिंग्लजमधील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात शिक्षण घेणारा मुलगाही घरी आहे.
नाईक यांना कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले असल्याची बाब सत्याप्पा कांबळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी नेर्ली व पोळकर यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली.यावर कसलाही विलंब न लावता दोघांनी प्रजासत्ताक दिनी नाईक यांच्या घरी जावून ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ, तेल, कडधान्य, चहा पावडर आदी सहा महिने पुरेल इतके जीवनाश्यक साहित्य दिले.
यावेळी अमित शेंडगे, आकाश जाधव, शिवप्रसाद चौगुले, दत्ताराम नाईक, मारूती कांबळे, संभाजी पोवार आदी उपस्थित होते.