इचलकरंजी पालिकेच्या चौकशीबाबत अहवाल द्या
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:52:03+5:302015-10-29T00:08:11+5:30
उच्च न्यायालयाचे आदेश : बरखास्तीच्या याचिकेवर सुनावणी

इचलकरंजी पालिकेच्या चौकशीबाबत अहवाल द्या
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमून कारवाई करावी, तसेच नगरपालिका बरखास्त करावी, यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेनुसार नगरविकास खाते व नगरपालिका प्रशासन संचालक यांनी काय कारवाई केली, याबाबतचा माहिती अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी एन.एच. पाटील व न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांनी शासनास दिले असल्याची माहिती अॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली.
या याचिकेची पुढील सुनावणी उच्च न्यायालयासमोर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखणे, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेचा खर्च अवाढव्य वाढला आहे. त्यामुळे दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी नगरपालिका असमर्थ ठरत आहे. भुयारी गटार योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, आदींमधील भ्रष्ट कारभारामुळे ही कामे पूर्ण होत नाहीत, अशा प्रकारचे आरोप करणारी याचिका राजेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दाखल केली आहे.
अशा आशयाच्या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले असल्याचे अॅड. सुतार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)