नांदणीत पुन्हा दारुविक्री सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 17:19 IST2017-07-13T17:19:01+5:302017-07-13T17:19:01+5:30
शिरोळ पोलिसांचे दुर्लक्ष; वरिष्ठांची कारवाई

नांदणीत पुन्हा दारुविक्री सुरुच
आॅनलाईन लोकमत
शिरोळ , दि.१३ : शिरोळ पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने जयसिंगपूर विभागीय पथकाने नांदणी (ता.शिरोळ) येथे बेकादेशीर दारु विक्रीप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला. तीन ठिकाणी देशी-विदेशी दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. टाकवडे येथेही एका ठिकाणी कारवाई केली. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष आणि वरिष्ठांची कारवाईची चर्चा होती.
शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे विना परवाना व बेकायदेशीर दारु विक्री सुरु आहे. त्याकडे बीट अंमलदारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नागरीकांतून पोलिस ठाण्याकडे तक्रारी येतात. मात्र, तुम्हीच अवैद्य व्यवसायाची ठिकाणे दाखवा, आम्ही कारवाई करतो असा सल्ला पोलिसांकडून मिळत असल्याने त्यांची निराशा होते.
स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याने गुरुवारी जयसिंगपूर पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने नांदणी व टाकवडे येथे छापा टाकून सचिन जुगळे, किरण घोरपडे व मारुती साबळे (तिघे रा.नांदणी, ता.शिरोळ) तर देवगोंडा पाटील (रा.टाकवडे, ता.शिरोळ) या चौघांजणांवर कारवाई केली. दरम्यान, नांदणी येथे पुन्हा दारु विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे आता शिरोळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीच कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.