डागडुजी अडकली लालफितीत
By Admin | Updated: December 1, 2014 21:03 IST2014-12-01T21:03:05+5:302014-12-01T21:03:05+5:30
सोहाळे येथील बंधारा : यंदा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर ?

डागडुजी अडकली लालफितीत
ज्योतिप्रसाद सावंत - आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर बांधण्यात आलेल्या सोहाळे येथील कोल्हापूर पद्धतीच्या उपबंधाऱ्याचे बरगे सडल्याने पाणी अडविण्याच्या कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रांतील शेतीच्या पिकासाठी व सोहाळे, बाची येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून, नव्या बरग्यांकरिता वर्कआॅर्डर त्वरित न झाल्यास ऐन उन्हाळ्यात नदीकाठाची पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
साळगाव, सोहाळे, बाची, आजरा व पारपोली क्षेत्रांतील काही भाग असा सुमारे २०० हेक्टर लाभक्षेत्र गृहीत धरून २००३ साली सोहाळे येथे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शासनातर्फे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. गेले तीन वर्षे या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; परंतु बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे सडल्याने गरजेवेळी पाण्याचा दाब वाढल्यामुळे हे दरवाजे निखळून साठविलेले पाणी वाहून जात आहे. यावर्षी अद्याप पाणी साठविण्याच्या कोणत्याच हालचाली सुरू नाहीत.
राजीव गांधी सिंचन व कृषी विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून पाणी देण्यात येईल, असे जलसंधारण विभागाने यावर्षी स्पष्ट केले आहे; पण सद्य:स्थितीला सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्चाची केवळ बरगे व डागडुजीकरिता तरतूद करावी लागणार आहे. जलसंधारण विभागाकडून वर्कआॅर्डर वेळेत न निघाल्याने यावर्षी बंधाऱ्यात पाणी साठविण्याबाबत साशंकता आहे.
बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यावर उन्हाळी पिकांसह उसाचे भवितव्य अवलंबून आहे. अनेक शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात यावर्षी पाणी साठणार नाही म्हणून उन्हाळी पिकेही घेतलेली नाहीत. तसेच पिण्याच्या पाण्याकरिता सोहाळेकरांना भटकंती करावी लागण्याची चिन्हे आहेत. जलसंधारण विभागाने बरग्यांकरिता प्रयत्न केल्यास आजही या बंधाऱ्यात पाणी साठू शकते. साळगाव बंधारा ते सोहाळे बंधारा दरम्यानच्या शेतकऱ्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही.
शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी जमा नाही : स्वामी
बंधाऱ्याची डागडुजी व शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० टक्क्यांप्रमाणे लोकवर्गणीनुसार ११ ते साडेअकरा लाख रुपये जमा होणे आवश्यक आहे. लोकवर्गणी जमा झाल्याशिवाय नियमानुसार वर्कआॅर्डर देता येत नाही, असे जलसंधारणचे सहायक अभियंता यु. आर. स्वामी यांनी सांगितले.
लोकवर्गणीसाठी पत्रव्यवहार सुरू : दोरुगडे
लोकवर्गणी शेतकऱ्यांनी त्वरित जमा करावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू असून, लोकवर्गणीबाबत शेतकऱ्यांमध्ये मतभेद असल्याने लोकवर्गणी जमा होण्यात अडचणी येत आहेत. नव्या बरग्यांबाबत त्वरित हालचाली झाल्यास लोकवर्गणी जमा होण्यास मदत होणार असल्याने बंधाऱ्याची देखरेख जबाबदारी असणाऱ्या पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत दोरुगडे यांनी स्पष्ट केले.