विद्यापीठ अध्यादेश तपासणी समितीचे पुनर्गठन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:44+5:302021-01-13T05:02:44+5:30
कोल्हापूर : विद्यापीठ अध्यादेश व परिनियमांची तपासणी करण्यासाठीच्या समितीचे राज्य शासनाने पुनर्गठन केले आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ...

विद्यापीठ अध्यादेश तपासणी समितीचे पुनर्गठन
कोल्हापूर : विद्यापीठ अध्यादेश व परिनियमांची तपासणी करण्यासाठीच्या समितीचे राज्य शासनाने पुनर्गठन केले आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलीप भारड यांचा सदस्यपदी समावेश करण्यात आला आहे. पुनर्गठित समितीचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला आहे.
अध्यादेश व परिनियमांची तपासणी करणाऱ्या समितीमध्ये आठ जणांचा समावेश आहे. त्यातील दोन सदस्य निवृत्त झाल्याने ही समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. पुनर्गठित समितीमध्ये उच्च शिक्षण संचालक (अध्यक्ष), नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलसचिव, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकारिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ कायदा अधिकारी परवीन सय्यद (सदस्य), उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांबरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक), कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या परिनियम, अध्यादेशांना मान्यता देण्यापूर्वी तपासणी अथवा छाननी करून तसेच स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठांचे पहिले परिनियम, आदेशांची तपासणी करून शासनास त्याबाबत शिफारस करण्याचे काम ही समिती करणार आहे.