राज्य सरकार आमच्या मरणाची वाट बघतेय का? ज्येष्ठ मल्ल मंडळींचा सवाल
By सचिन भोसले | Updated: October 10, 2023 12:16 IST2023-10-10T12:13:43+5:302023-10-10T12:16:24+5:30
ज्येष्ठ मल्ल मंडळी व त्यांच्या विधवा पत्नींना सरकारकडून सहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जाते. तेही आता सात महिन्यांपासून रखडले आहे.

राज्य सरकार आमच्या मरणाची वाट बघतेय का? ज्येष्ठ मल्ल मंडळींचा सवाल
कोल्हापूर : लाल माती गाजविणाऱ्या हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी व ज्येष्ठ मल्ल व त्यांच्या पश्चात विधवा पत्नींना राज्य शासनाकडून मिळणारे मानधन गेल्या सात महिन्यांपासून रखडले आहे. मानधनासाठी वारंवार क्रीडा कार्यालयाकडे विनंत्या करण्यापेक्षा मेलेले बरे. आमच्या मरणाची सरकार वाट पाहतेय का? असा सवाल आता ही ज्येष्ठ मल्ल मंडळी विचारू लागली आहेत. ज्येष्ठ मल्ल मंडळी व त्यांच्या विधवा पत्नींना सरकारकडून सहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जाते. तेही आता सात महिन्यांपासून रखडले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बक्षीस समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मल्लांचे मानधन आताच्या मानधनाच्या तीनपट करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही यात एक पैशाचीही वाढ झालेली नाही.
आमच्या हयातीतच मानधन महिन्याच्या महिन्याला थेट बँकेत जमा होऊ दे. सरकार काय आमच्या मरणाची वाट बघतेय का, आमची लाल मातीप्रती सेवा सरकार विसरून गेलेय का?
- हिंदकेसरी दीनानाथसिंह