खासगी रक्तपेढ्यांतील रक्तदर तफावत दूर करा
By Admin | Updated: March 9, 2015 23:44 IST2015-03-09T23:15:50+5:302015-03-09T23:44:04+5:30
ग्राहक संरक्षण परिषदेत सूचना : विविध समस्यांंवर चर्चा

खासगी रक्तपेढ्यांतील रक्तदर तफावत दूर करा
कोल्हापूर : जिल्ह्यातील खासगी रक्तपेढ्यांच्या रक्तदरामधील तफावत थांबवून सर्वत्र समान दर करावा, त्याचबरोबर रक्तघटक करणाऱ्या यंत्रांची तपासणी करावी, अशा सूचना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजाराम माने होते. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद हे ग्राहक हिताच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण माध्यम आहे. त्यामुळे ग्राहक हितासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कटिबद्ध राहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्यांवर नेमकी चर्चा व्हावी. त्या अंतर्गत ग्राहकांच्या लेखी समस्या संबंधित विभागांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. ग्राहक संरक्षण परिषदेने ग्राहकांच्या नेमक्या, महत्त्वाच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी उपयुक्त सूचना कराव्यात, असेही माने म्हणाले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी ग्राहक संरक्षण परिषदेने ग्राहकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून समस्या नेमकेपणाने मांडावी व विधायक सूचना कराव्यात, असे स्पष्ट केले. बैठकीत पेट्रोल पंपांवर ग्राहकांना पाणी मिळावे, स्वच्छतागृहांची सुविधा द्यावी, सराफांच्या वजनकाट्यामधील फरक ओळखण्यासाठी वैधमापन विभागाकडे अधिकृत प्रमाणित वजन-मापाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, शेती उत्पन्न बाजार समितीमधील माल खरेदीवेळी कर आकारणी थांबवावी, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ यांनी उपस्थित राहावे, एस. टी. महामंडळाच्या दरांची तफावत थांबवावी, राधानगरी धरण परिसरातील शेतक ऱ्यांना दिवसा वीज द्यावी, वडापच्या मनमानी दर व अतिरिक्त प्रवासी बसविण्यावर नियंत्रण ठेवावे, अशा समस्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, ग्राहक संरक्षण परिषदेचे संजय हुक्केरी, वसंत हेरवाडे, बी. जे. पाटील, सतीश फणसे, जगन्नाथ म्हाळंक यांच्यासह अन्न व औषधी प्रशासन, दूरसंचार विभाग, वैधमापन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, तसेच ग्राहक हक्क संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)