शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर याद राखा

By Admin | Updated: August 1, 2015 00:07 IST2015-08-01T00:07:12+5:302015-08-01T00:07:12+5:30

राजू शेट्टी : रस्त्यावरील लढाई करण्यास सज्ज; उदगाव येथे शेतकरी मेळावा

Remember to blackmail the farmers | शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर याद राखा

शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर याद राखा

जयसिंगपूर : ऊस जादा आहे, साखरेला दर नाही, त्यामुळे साखर कारखाने बंद ठेवू असे सांगून शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल, तर याद राखा, असा सज्जड इशारा देत आगामी हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी केले. उसाच्या यंदाच्या एफआरपीसह पुढील वर्षाचीही वाढीव एफआरपी कारखानदारांच्या मानगुटीवर बसून वसूल करणार असल्याचेही यावेळी खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.
उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फरीद नदाफ होते. खा. शेट्टी म्हणाले, कारखाने बंद ठेवणार असल्याची आवई साखर कारखानदार आतापासूनच उठवत आहे. साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. त्यांनी जर कारखाने चालू केले नाहीत, तर साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यास भाग पाडू. शेतकरीही ऊस घालवण्यास तयार आहे. सध्या साखरेचे दर बाजारात कोसळले आहेत. जवळपास १ कोटी ६० लाख टन साखर शिल्लक आहे. देशाची गरज २४० लाख टन आहे. तरीही येणाऱ्या हंगामात २६० लाख टन साखर उत्पादित होणार आहे. १ कोटी टन साखर शिल्लक राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने त्वरित साखरेचा ६० लाख टनाचा बफर स्टॉक करावा व उर्वरित साखर निर्यात केल्यास शिल्लक साखरेचा प्रश्न मिटणार आहे.
ते हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले यश मिळाले आहे. गावातील विकासाच्या धोरणात सदस्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास गावचा विकास होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी तसेच आघाडीमधून निवडून आलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, अण्णासो चौगुले, जि. प.चे बांधकाम सभापती सीमा पाटील, पं. स.चे सभापती शीला पाटील, उपसभापती वसंत हजारे, जि. प.चे सदस्य सावकर मादनाईक, जि. प.चे सदस्य सुरेश कांबळे, तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

एफआरपी बदलल्यास गंभीर परिणाम
खा. शेट्टी म्हणाले, सन २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी एफआरपीमध्ये १०० रुपयाने वाढ झालेली आहे. त्यातच साखर कारखानदार साखरेच्या दराची भीती घालून एफआरपी बंद करा, अशी ओरड सुरू करत आहेत. एफआरपी बदलण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Remember to blackmail the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.