शक्य असेल तरच पुनवर्सन, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST2021-08-17T04:29:44+5:302021-08-17T04:29:44+5:30
शिये : येथील संबंधित जागेची शासकीय मोजणी करून शक्य असेल तरच पुनर्वसन करू, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने ...

शक्य असेल तरच पुनवर्सन, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव द्या
शिये : येथील संबंधित जागेची शासकीय मोजणी करून शक्य असेल तरच पुनर्वसन करू, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर करावा, अशा सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या. शियेतील पुनर्वसन आणि अतिक्रमणप्रश्नी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिये येथील सर्वपक्षीय पुनर्वसन समिती व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांच्यात खडाजंगी झाली. याचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना नावडकर यांनी बाहेर काढले. शिये ( ता. करवीर ) येथील सर्वपक्षीय पुनर्वसन समिती व शेतकरी संघटनेतील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय समितीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदन दिले होते. मंत्री पाटील यांनी यामध्ये तत्परता दाखवत सोमवारी प्रांत, तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. सुरुवातीला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक २५९ आणि २८३ वरील रिकामी जागा शासनाने ताब्यात घेऊन तेथील स्थळ पाहणी करून पुनर्वसन करावे, गुरव खडी येथील सध्याची भौगोलिक परिस्थिती नागरी वसाहतीसाठी योग्य नाही, असे सांगितले. त्यानंतर कृती समितीच्यावतीने जयसिंग पाटील म्हणाले, पुनर्वसन व्हावे हीच गावची इच्छा आहे. कागदोपत्री रिकाम्या जागेत अतिक्रमण आहे. काही भूखंडधारकांना मिळालेल्या जागेत आर्थिक परिस्थितीमुळे बांधकाम करता आले नाही. शिवाय अज्ञानामुळे काहींना आपले भूखंड कागदोपत्री नोंदवता आले नाहीत. गुरव खडी येथे एकाच ठिकाणी सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे - भांबरे, सरपंच रेखा जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सर्जेराव काशीद, जिल्हा परिषद माजी सदस्य बाजीराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य जयसिंग काशीद, रणजित कदम, विकास चौगले, प्रभाकर काशिद, तेजस्विनी पाटील, पांडुरंग पाटील, मनीषा सिसाळ, उत्तम पाटील, देवदास लाडगावकर, धनाजी चौगले आदी उपस्थित होते.
फोटो : १७ शिये बैठक
शियेतील पुनर्वसन आणि अतिक्रमणप्रश्नी आयोजित बैठकीत करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शियेतील सर्वपक्षीय पुनर्वसन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.