सांगरूळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीवेळी बाळ दगावल्याने नातेवाइकांनी डॉक्टरांचा हलगर्जीपणा व वेळेत उपचार केले नाहीत, यामुळे बाळ दगावले, असा आरोप करत आरोग्य केंद्रात गोंधळ घातला. दरम्यान, बाळाची आई वृषाली साठे यांची प्रकृती रक्तस्राव जास्त झाल्यामुळे नाजूक आहे. त्यांची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांनी सीपीआर येथे थांबून राहावे, असा आग्रह धरत नातेवाइकांनी ठिय्या मांडला.सांगरुळ येथील वृषाली साठे यांना प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. सायंकाळी सहानंतर त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. पहिलीच डिलिव्हरी असल्यामुळे प्रसूती वेदना देता येत नव्हत्या. त्यामुळे रुग्णाला सीपीआरला घेऊन जायला सांगितले असता येथेच उपचार करा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. आरोग्य केंद्रात पुरेशी औषधे आणि सिझेरिनची सोय नाही, अशा सूचना नातेवाईक यांना डॉक्टरांनी देऊन तसे लेखी लिहून घेऊन उपचार सुरू केले.दरम्यान, बाळाचे वजन आणि वाढ चांगली झाली असल्याने नॉर्मल प्रसूती होत नव्हती. दरम्यान, वृषाली यांना सीपीआर येथे शिफ्ट करावे लागणार होते. पण, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. कोल्हापूर येथून रुग्णवाहिका आल्यानंतर वृषाली यांना सीपीआर येथे हलविले. तेथील डॉक्टरांनी सिझेरियन करून प्रसूती केल्यानंतर बाळ दगावले.
यानंतर गुरुवारी नातेवाइकांनी सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन डॉक्टर व कर्मचारी यांना धारेवर धरत आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप केला. यावेळी नातेवाइकांनी येथे ठिय्या मांडला होता. बाळाच्या आईची तब्येत स्थिर हाेत नाही तोपर्यंत डॉक्टरांनी सीपीआरला थांबावे, असा आग्रह भरत साठे, नवनाथ साठे, सोमनाथ साठे, शत्रुघ्न साठे, कार्तिक साठे, आर्यन साठे यांनी केला.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती घेतली असता सांगितले की प्रसूती करत असताना संबंधित महिलेला वेदना कमी होत्या, यामुळे रुग्णाला कोल्हापुरात हलवावे, अशी सूचना केली होती. त्यांच्याकडून तसे लेखी लिहून घेतले होते. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक उपचार केल्याचे सांगितले.
महिलेच्या प्रसूतीसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. प्रसूती वेदना कमी होत्या. यामुळे रुग्णाला सीपीआरला पाठवले. १०८ नंबर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे सीपीआरची ॲम्ब्युलन्स येण्यास विलंब झाला. यानंतर सीपीआर येथे रुग्णाला पाठवले. वर्षभरात १५० प्रसूती विनातक्रार केल्या आहेत. -डॉ. शुभम जाधव, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगरूळ