रक्तदानातून जपली माणुसकीची नाती
By Admin | Updated: July 3, 2016 00:54 IST2016-07-03T00:54:31+5:302016-07-03T00:54:31+5:30
‘लोकमत’च्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : जवाहरलालजी दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य

रक्तदानातून जपली माणुसकीची नाती
कोल्हापूर : समाजात घडणाऱ्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवितानाच सामाजिक बांधीलकीचे व्रत जपलेल्या ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे शनिवारी आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानासारख्या श्रेष्ठ दानाच्या माध्यमातून जणू माणुसकीच्या नात्याचा धागा जोडण्यात आला. दिवसभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक, शिक्षक, महिला, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक व ‘लोकमत’मधील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ‘अर्पण ब्लड बँक’ यांचे सहकार्य लाभले. राधाकृष्ण मंदिर हॉल येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी डॉ. प्रकाश गाडवे, हिंदू धर्म मंडळ संस्थेचे दिलीप कोडोलीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्यांदाच रक्तदान करणारे राधेश्याम सारडा यांच्यापासून शिबिरास सुरुवात झाली. त्यानंतर ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्या प्राजक्ता पडगे यांनी रक्तदान केले. त्यांनी यापूर्वी बारा वेळा रक्तदान केले आहे. शिबिरास अर्पण ब्लड बॅँकेचे अर्जुन शेळके, नीलम मोहिते, नम्रता मगदूम, राजश्री लांबोरे, राहुल जाधव यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
पोलिस दलातर्फेही प्रतिसाद : ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे शनिवारी आयोजित रक्तदान शिबिरात सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भूतकर, एस. यू. खरात, एम. पी. रेपे, ए. जे. नाईक, आर. बी. यादव, डी. ए. पाटील, एस. पी. सवजेकर, ए. पी. छत्रे, एस. एम. संकपाळ, केशव राठोड यांनी रक्तदान केले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, ‘शाहूपुरी’चे निरीक्षक प्रवीण चौगले उपस्थित होते.
मोलाचे सहकार्य
या शिबिरास शाहुपूरी तिसऱ्या गल्लीतील हिंदू धर्म मंडळ संस्थेचे सहकार्य लाभले. ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या संस्थेने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संस्थेतर्फे दरवर्षी प्राणायाम, योग यांसह अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
६९ वे रक्तदान
मलिक मेहंदी गोवावाला यांनी १९९४ पासून रक्तदान संकल्पास सुरुवात केली. या शिबिरात त्यांनी ६९ व्या वेळी रक्तदान केले. रक्तदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर व्हावेत व लोकांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी ते प्रबोधनाचे कामही करतात. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचा संकल्पही केला आहे.
योगायोग :
माधव भिलवडीकर वयाच्या अठराव्या वर्षापासून रक्तदान करतात. या शिबिरात त्यांनी ४८ व्या वेळी रक्तदान केले. पेशाने नृत्यप्रशिक्षक असलेले भिलवडीकर यांनी नागपुरात पहिल्यांदा कोल्हापूरच्या एका गरजू रुग्णासाठी रक्तदान केले होते. कामानिमित्त कोल्हापूरला आले असताना पुन्हा कोल्हापूरमध्येच त्यांनी रक्तदान केले, हा एक योगायोगच असल्याचे त्यांनी सांगितले.
वृत्तपत्र विक्रते ५३ वर्षीय हेमंत वेद यांनी शिबिरात साठाव्यांदा रक्तदान करून ‘लोकमत’च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.