लोकसहभागातून विहिरीचे पुनरुज्जीवन

By Admin | Updated: January 16, 2015 00:14 IST2015-01-15T23:55:55+5:302015-01-16T00:14:58+5:30

वडगावातील रहिवासी : १७ जणांनी टप्प्याटप्याने पाच लाखांचा निधी केला संकलित

Rejuvenation of wells from people's participation | लोकसहभागातून विहिरीचे पुनरुज्जीवन

लोकसहभागातून विहिरीचे पुनरुज्जीवन

सुहास जाधव - वडगाव -वाढीव वसाहतीमध्ये पुरेसे रहिवासी झाल्याशिवाय विकासकामे करणे हे पालिकेसमोर आव्हानात्मकच असते; पण वडगाव येथील दत्तनगरातील १७ जणांनी यावर मात केली. या सर्वांनी पाच लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने संकलित करून विहिरीचे पुनरुज्जीवन केले. येथे पाणीपुरवठ्याची सोय केली. ‘एकत्र येणे म्हणजे, गती, गती म्हणजे प्रगती’ ही म्हण साकारल्याचे दिसते.
शहरात वाढीव वसाहतीमध्ये जागा खरेदी ते बांधकाम व राहण्यास जाणे हे दिव्यच असते. येथे संपूर्ण वसाहत विकसित झाल्याशिवाय रस्ते, गटर्स, दिवे, आदींची सुविधा पालिका प्रशासन करू शकत नाही. मात्र, येथे राहणाऱ्या नागरिकांना बांधकाम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने घराचे सुख मिळण्यास ‘वाट’ बघावी लागते.
सध्या वडगावसह सर्वच शहरांतील वाढीव वसाहतीमध्ये असे चित्र आहे. नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्याची तरी सोय व्हावी, म्हणून पालिकेचा टँकर आठवड्यातून दोन ते तीन वेळेला येतो. इतर खर्चासाठी विविध ठिकाणांहून पाण्यासाठी भटकंती ठरलेली असते. हा नागरिकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार, प्रयत्न करणे आवश्यक असते.
वडगाव-हातकणंगले रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दत्तनगर वसाहत आहे. ही जागा बांधकाम व्यावसायिक आनंदराव पाटील यांनी विकसित केली. येथे ९० भूखंड पाडण्यात आले. अशा वसाहतीमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. या वसाहतीमधील १७ नागरिकांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी मंथन, बैठका घेतल्या. या सर्वांनी या जागेत पडिक व मुजण्याच्या मार्गावर असणाऱ्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जागामालक आनंदराव पाटील व पालिकेची परवानगी घेण्यात आली.
यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते. याचा मासिक खर्चही ८० ते ९० रुपये वीज बिलात येतो.
२९ जून २०१४ ला पाणीपुरवठ्याचे लोकार्पण झाले. येथील सर्व जाती, धर्माचे लोक गणेश उत्सवासह विविध कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करतात. यामध्ये आणखी इच्छुकांनाही सहभागी करून व्याप्ती वाढवावी. त्यामुळे चांगली योजना सार्थकी लागेल. तसेच नव्याने राहण्यास येणाऱ्या नागरिकांना पाणी योजनेत सहभागी करून घ्यावे, यामुळे लोकसहभागाचा उद्देश सफल होईल.

यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते.

Web Title: Rejuvenation of wells from people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.