पुनर्वसनाच्या शिक्क्याची शेतकऱ्यांना धोंड
By Admin | Updated: November 27, 2014 00:50 IST2014-11-27T00:29:45+5:302014-11-27T00:50:01+5:30
मध्यम मुदत कर्जापासून वंचित : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना फटका; अधिकाऱ्यांची नुसतीच टोलवाटोलवी

पुनर्वसनाच्या शिक्क्याची शेतकऱ्यांना धोंड
विश्वास पाटील- कोल्हापूर -शेतजमिनीच्या सात बारा व आठ-अ या दस्तऐवजांवर पुनर्वसनासाठी जमीन घेतल्याची नोंद असल्याने त्या जमिनीची आणेवारी महसूल खात्याकडून होत नाही. त्याचा परिणाम म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकांकडून मध्यम मुदतीचे कर्ज मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अनेक वर्षे ही कुचंबणा होत आहे; परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी कुणीच प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना कमी व्याजदराचे सोडून खासगी वित्तीय संस्थांचे चढ्या दराने कर्ज घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
काल, मंगळवारी गगनबावडा तालुक्यातील सांगशी येथील पाच-सहा शेतकरी जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे आले होते. गावातील सांगसाई सेवा संस्थेचे ते सभासद आहेत. त्यांना नियमित पीककर्ज मिळते. रावजी बापू यादव व नारायण बापू यादव या भावांना शेती सुधारणा करण्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज हवे आहे.
एकूण चौघे भाऊ व आई अशा पाचजणांच्या नावांवर २५ एकर जमीन आहे. त्या व्यतिरिक्त चार एकर जमीन यापूर्वीच त्यांनी पुनर्वसनासाठी दिली आहे; परंतु त्यांच्या सगळ्या क्षेत्रांवर ‘पुनर्वसन निर्बंध लागू’ असा उल्लेख असल्याने तलाठ्याने जमिनीची कित्येक वर्षांत आणेवारी केलेली नाही.
प्रत्यक्षात चारही भाऊ जमीन स्वतंत्र कसतात. त्यांचे पाटबंधारे विभागाचे स्वतंत्र पाणी परवानेही आहेत. मध्यम मुदतीच्या कर्जासाठी ते पात्र आहेत. परंतु निव्वळ जमिनीची ते कसत असलेल्या हिश्श्यानुसार कागदोपत्री नोंद नसल्याने बँक कर्ज देऊ शकत नाही; कारण पीककर्जास पीक तारण असते. मध्यम मुदतीच्या कर्जास शेतजमीन तारण असते; परंतु ती तारण घेण्यासाठी अडचणी येत असल्याने पात्र असूनही कर्ज मिळत नाही. गेले महिनाभर हे शेतकरी बँकेकडे हेलपाटे मारत होते. शेवटी सेवा संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील हे त्यांना घेऊन थेट प्रशासकांनाच भेटले. शेतकरी म्हणून आम्ही काय करायला हवे अशी विचारणा त्यांनी बँकेला केली. श्री.चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घालून बँकेच्या निरीक्षकास व विकास अधिकाऱ्यास नव्याने प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली.
संबंधित शेतकऱ्यांकडून मालकीबाबतचे प्रतिज्ञापत्र घेऊन कर्ज देण्याबाबत बँक विचार करीत आहे. हे एक प्रकरण झाले; परंतु अशाच आणखी काही शेतकऱ्यांच्या अडचणी असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
सांगशी गावचे संबंधित शेतकरी मध्यम मुदत कर्जास पात्र आहेत; कारण त्यांचे क्षेत्र जास्त आहे. ऊसपीक घेतात. शिवाय बँकेचा त्यांना पीककर्ज पुरवठाही आहे; परंतु आणेवारी नसल्याने मध्यम मुदत कर्ज देताना अडचणी येत आहेत. अशाच अडचणींबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्याची प्रकरणनिहाय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
- प्रतापसिंह चव्हाण, प्रशासक,
जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूर
आमची सांगसाई सेवा संस्था गेली सात वर्षे शंभर टक्के वसुली करीत आहे. बँकेने सभासदांना मध्यम मुदतीचे कर्ज मंजूर न केल्याने सेवा संस्थेच्या उलाढालीवरही परिणाम झाला आहेच; शिवाय त्या शेतकऱ्यांना त्यांना हक्काचे कमी व्याजदराचे कर्ज सोडून जादा व्याजदराचे कर्ज घ्यावे लागत आहे. या प्रकरणाशी संबंधितच एका भावाने १८ टक्के व्याजाचे कर्ज खासगी संस्थेकडून घेऊन गेल्यावर्षीच ट्रॅक्टर घेतला आहे.
- भगवान पाटील, अध्यक्ष,
सांगसाई सेवा संस्था, सांगशी
महिनाभर शेतकऱ्यांनी बँकेकडे मारले हेलपाटे
नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या बँक निरीक्षकांना सूचना
अनेक शेतकऱ्यांची कुचंबणा
मध्यम मुदत कर्ज
जिल्हा बँक शेतकऱ्यांना पाईपलाईन, ट्रॅक्टर खरेदी, शेतघर बांधकाम, गोठा, शेतकरी निवास, विहीर खुदाई, जुनी विहीर दुरुस्ती, द्राक्षबाग, मिनी डेअरी, जमीन विकास या कारणांसाठी जमीन तारण ठेवून हे कर्ज देते. या कर्जाचा व्याजदर ११ ते १३ टक्क्यांपर्यंत असतो. त्याचा परतफेड कालावधी पाच ते नऊ वर्षे असतो. एक ते पंधरा लाखांपर्यंत हे कर्ज दिले जाते.