पुनर्वसन घरकुलांचा निधी अन्यत्र वळविणार

By Admin | Updated: March 12, 2015 00:10 IST2015-03-11T22:16:05+5:302015-03-12T00:10:39+5:30

जयभीमनगर, नेहरूनगरमधील लाभार्थी : झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभार्थी घरकुलांपासून वंचित होण्याची भीती

The rehabilitation of the reclamation of houses will turn aside | पुनर्वसन घरकुलांचा निधी अन्यत्र वळविणार

पुनर्वसन घरकुलांचा निधी अन्यत्र वळविणार

इचलकरंजी : शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनामधील जयभीम व नेहरूनगर याठिकाणी घरकुलांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असतानाच तेथील ७०९ लाभार्थ्यांमध्ये वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी त्याठिकाणचा निधी जाधव मळा, भोरे वसाहत, लालनगर व शहापूर पूरग्रस्त वसाहतीमधील घरकुले बांधण्यासाठी वळविण्यात येणार आहे.
शहर झोपडपट्टीमुक्तीसाठी सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे व सत्तारूढ कॉँग्रेसने झोपडपट्टी वसाहतींचे सर्वेक्षण केले. त्यापैकी नेहरूनगर, जयभीम व रेणुका या तीन झोपडपट्टी वसाहतींचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत मंजुरी घेण्यात आली. जयभीम झोपडपट्टीतील ७२० व नेहरूनगरमधील ६३६ झोपडपट्टींचा प्रस्ताव मंजूर झाला. तर रेणुका झोपडपट्टीचे जाग्याचे आरक्षण बदलण्यासाठी तो प्रलंबित राहिला.झोपडपट्टी पुनर्वसनाच्या घरकुल इमारती बांधण्यासाठी ३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असून, त्याचा पावणेचार कोटी रुपयांचा पहिला हप्ता पालिकेला प्राप्त झाला आहे. तर ४.०८ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच नगरपालिकेला दिला आहे. सध्या जयभीमनगरमध्ये ११ इमारती पूर्ण अवस्थेत असून, त्यामध्ये ४४४ लाभार्थ्यांच्या घरकुलांची सोय आहे. त्याठिकाणी अद्याप १८६ लाभार्थी शिल्लक आहेत. नेहरूनगर येथे ४८ लाभार्थ्यांची घरकुल असलेली एक इमारत पूर्ण अवस्थेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याठिकाणी आणखीन ७५ लाभार्थ्यांनी आपली जागा रिकामी करून दिली आहे. त्यांच्यासाठीही तेथे इमारत लवकरच बांधली जाईल; पण त्याठिकाणी असलेल्या उर्वरित ५२३ लाभार्थ्यांनी आपल्या जागा रिकाम्या करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे तेथे या लाभार्थ्यांसाठी घरकुलांच्या इमारतींची बांधणी होणे सध्या तरी अशक्य वाटत आहे. त्यामुळे या ५२३ लाभार्थ्यांची घरकुलांविना मोठी पंचाईत होणार आहे. जयभीमनगरातील १८६ व नेहरूनगरमधील ५२३ अशा ७०९ लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी मंजूर असलेला निधी रद्द होऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी भोरे वसाहतीमधील ४८, जाधव मळा येथे १३२, शहापूर पूरग्रस्त वसाहतीमध्ये ३६ व लालनगरमधील लाभार्थ्यांना घरकुलांच्या इमारतीसाठी हा निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव पालिका तयार करीत आहे. (प्रतिनिधी)


१४.५ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या घरकुलांच्या इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे रेंगाळले आहे. तर बांधकाम क्षेत्रातील सिमेंट व वाळूचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत इचलकरंजीत सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी आणखीन १४.५ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत ७ मार्चला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींनी चर्चा केली. त्यावेळी मंत्री मेहता यांनी प्रस्तावाचा शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Web Title: The rehabilitation of the reclamation of houses will turn aside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.