‘नगरोत्थान’च्या रस्त्यांसाठी फेरनिविदा
By Admin | Updated: December 9, 2014 23:51 IST2014-12-09T23:38:57+5:302014-12-09T23:51:30+5:30
दहा ठिकाणचे रस्ते : १३ कोटींच्या कामासाठी ठेकेदार मिळेना; ‘नगरोत्थान’च्या अडचणीत भर

‘नगरोत्थान’च्या रस्त्यांसाठी फेरनिविदा
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांसाठी काढलेल्या निविदेची काल, सोमवारी मुदत संपली. त्यामुळे ठेकेदारांनी असमर्थता दर्शविल्याने शहरातील ए वॉर्डातील विविध दहा रस्त्यांच्या १३ कोटी रुपयांच्या कामांची फेरनिविदा काढावी लागणार आहे. १०८ कोटींच्या या योजनेतील उर्वरित कामे सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी कासव छाप बनलेल्या नगरोत्थान योजनेतील रस्त्यांचे ठेकेदारांना ‘काम घ्या काम’ म्हणण्याची वेळ महापालिकेवर पुन्हा आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठविलेल्या शहरातील रस्त्यांच्या १०८ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार मुंबईस्थित ‘शांतीनाथ रोडवेज’, ‘रेलकॉन’ व ‘यूव्हीबी’ अशा तीन कंपन्यांनी ही कामे मिळविली होती. मे २०११ मध्ये जेव्हा त्यांना वर्क आॅर्डर दिली गेली, तेव्हा तोंडावर पावसाळा होता. त्यामुळे आॅक्टोबर २०११ पासून पुढे दीड वर्षाची मुदत त्यांना कामे पूर्ण करण्यासाठी देण्यात आली होती. कामाची मुदत संपली तरी केवळ पंधरा टक्के काम पूर्ण झाले. यानंतर पुढील कामे बंद पडली. वेळोवेळी ठेकेदारांना नोटिसा देऊनही त्यांनी कामे पूर्ण करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे ११ रस्त्यांच्या फेरनिविदा काढल्या. यानंतर संपूर्ण कामांचे विभाजन करून लहान स्वरूपाच्या निविदा तब्बल पाचवेळा काढाव्या लागल्या.
मनपाने ठेकेदारांवर वचक बसावा म्हणून त्यांच्या सुरक्षा ठेव रकमा जप्त करण्याचाही निर्णय घेतला. कामांना विलंब लावला म्हणून संबंधित ठेकेदारांना करारातील तरतुदीप्रमाणे प्रतिदिनी दंड केला जाणार आहे.
सुरुवातीपासूनच निविदेकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ज्या ठेकेदारांना कामे न देण्याचा निर्णय झाला होता व ज्यांच्याविरोधात तक्रारी होत्या, अशांच्याही निविदा महानगरपालिकेने मंजूर केल्या आहेत. डिसेंबरअखेर सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ए वॉर्डातील १३ कोटींच्या विविध दहा रस्त्यांचे काम करायला ठेकेदार मिळत नसल्याने पुन्हा या रस्त्यांसाठी अल्पकाळाची निविदा काढली जाणार आहे. (प्रतिनिधी)
नगरोत्थान योजनेतील उर्वरित २८ किलोमीटरच्या रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. ए वॉर्डातील दहा किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने आता पुन्हा अल्पकाळाची निविदा प्रसिद्ध केली जाईल.
- एम. एम. निर्मळे
(कार्यकारी अभियंता, महापालिका)