आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, मगच काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST2020-12-06T04:26:31+5:302020-12-06T04:26:31+5:30
फोटो ओळी : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बाळेश नाईक, शिवाजी ...

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा, मगच काम
फोटो ओळी : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बाळेश नाईक, शिवाजी गुरव, संतोष बेलवाडे
उत्तूर . गेली २१ वर्षे रेंगाळलेल्पा आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांनी आधी पुनर्वसन करा, मगच कामास सुरुवात करा. पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, अशी मागणी माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी आंबे ओहळ धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केली.
ॲड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, आंबेओहळ प्रकल्पग्रस्त न्यायासाठी रस्त्यावरची लढ़ाई करीत आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्नसनाची बैठक शासकीय अधिकारी यांच्यासमवेत घेण्याचे ठरले असताना प्रकल्पाचे काम सुरू करणे अयोग्य आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवा, अन्यथा धरणग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव म्हणाले, २१ वर्ष पुनर्वसनासाठी लढूनही आजपर्यंत न्याय मिळाला नाही. अधिकारी हे धरणग्रस्तांसोबत बनवेगिरी करतात. पुन्हा पुन्हा नोटिसा काढून धरणग्रस्तांना वेठीस धरतात. आमचे प्रश्न सोडवा, मगच धरणाचे काम करा अन्यथा आमचा जीव गेला तरी आता माघार नाही. काम सुरू केले तर काम बंद पाडणार.
यावेळी पं. स. सदस्य बाळेश नाईक, वडकशिवालेचे सरपंच संतोष बेलवाडे, सचिन पावले यांची भाषणे झाली. प्रकल्पाचे अधिकारी खट्टे, बारदेस्कर यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले.
प्रकल्प स्थळी, महादेव खाडे, नामदेव पोटे, बजरंग पुंडपळ, श्रीराम चौगुले, मधुकर पोटे यांच्यासह कर्पेवाडी, होन्याळी, आर्दाळ गावांतील धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांशी फोनवरून चर्चा
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी ॲड. शिंदे फोन करून प्रकल्पाबाबत माहिती, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवा. नियोजित ११ डिसेंबरची बैठक तातडीने घ्या, अशी मागणी केली. ११ तारखेपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना करतो, असे पालकमंत्री पाटील यांनी ग्वाही दिली.
मंत्री मुश्रीफ फार हुशार
एखादा कार्यकर्ता विरोधात गेला तर त्याच्या मदतीला कसे धावायचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना माहीत आहे. धरणग्रस्तांनी ठरवून विरोध केला तर मुश्रीफ नक्की मदत करतील. मुश्रीफ हे फार हुशार असल्याचा टोला ॲड शिंदे यांनी लगावला.