नियामक मंडळाची गुरुवारी बैठक
By Admin | Updated: November 9, 2014 01:37 IST2014-11-09T00:51:39+5:302014-11-09T01:37:10+5:30
ऊसदर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियामक मंडळास मंजुरी; उद्या अध्यादेश

नियामक मंडळाची गुरुवारी बैठक
कोल्हापूर : ऊसदर नियामक मंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी उशिरा मान्यता दिली. या निर्णयामुळे ऊसदराचा प्रश्न लवकर निकालात निघण्यास मदत होणार आहे. पहिल्या उचलीबाबत नूतन नियामक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी (दि. १३) मुंबईत होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी ऊसदरासाठी होणारे आंदोलन व त्यातून होणारे कारखान्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वीज नियामक मंडळाच्या धर्तीवर ऊसदर नियामक मंडळाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. आघाडी सरकारने याचा मसुदा तयारही केला होता; पण त्याला गती आली नव्हती. भाजप सरकार सत्तेवर येताच नियामक मंडळ स्थापनेचा निर्णय घेतला. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल नियामक मंडळाची रचना निश्चित केली. यामध्ये विक्रमसिंह घाटगे, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यासह बाराजणांचा समावेश केला. नियामक मंडळाचा प्रस्ताव मंत्री पाटील यांनी काल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी काल उशिरा मंडळाला मान्यता दिली. आज, शनिवारी व उद्या, रविवारी सुटी असल्याने याचा अधिकृत शासकीय अध्यादेश सोमवारी (दि. १०) प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रक्रिया गती घेणार आहे. मंडळाच्या सदस्यांची ऊसदराबाबत पहिली बैठक गुरुवारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या आठ-दहा दिवसांत पहिल्या उचलीचा प्रश्न निकालात निघण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)