व्यापारी-उद्योजकांची कर्जे नियमित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:38+5:302021-07-30T04:25:38+5:30
कोल्हापूर : महापुरामुळे नुकसानीत आलेल्या व्यापारी-उद्योजकांच्या कर्जाचे बँकांनी पुनर्गठन करून द्यावे व व्याजात सवलत द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल ...

व्यापारी-उद्योजकांची कर्जे नियमित करा
कोल्हापूर : महापुरामुळे नुकसानीत आलेल्या व्यापारी-उद्योजकांच्या कर्जाचे बँकांनी पुनर्गठन करून द्यावे व व्याजात सवलत द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने यांना दिल्या. वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळांनी याबाबतची मागणी केली होती.
यावेळी ललित गांधी यांनी व्यापारी-उद्योजकांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळावी, विमाधारकांना क्लेम मिळण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात यावी, व्यावसायिकांची कॅश क्रेडिट कर्जे मुदत कर्जात वर्ग करावीत, त्याला एक वर्षाचा मोरॅटेरीअम वेळ द्यावा, व्यापाऱ्यांना ५ लाखांपर्यंतची कर्जे वार्षिक ३ टक्के व्याजाने व त्यापुढील कर्जे ५ टक्के व्याजाने द्यावीत. व्याजातील ही सवलत किमान एक वर्षासाठी मिळावी. थकीत कर्जे पुनर्गठीत करून नियमित करावी, अशी मागणी केली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांच्या क्लेमसंबंधी एक-दोन दिवसातच बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील तसेच बँक कर्ज व व्याज सवलती या राष्ट्रीयकृत व खासगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकातून घेतलेल्या कर्जासाठीही मिळाव्यात यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करू असे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे मानद सचिव जयेश ओसवाल, प्रतीक चौगुले, रणजित पारेख, प्रशांत पाटील, नीलेश शहा, जयंत गोयाणी, दीपक केसवानी, मनोज बहिरशेठ, दर्शन गांधी, अमित लोंढे, शाम बासराणी उपस्थित होते.
दरम्यान वीकेंड लॉकडाऊन रद्द करावा व दुकानाच्या वेळा रात्री ९ पर्यंत वाढवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
--
फोटो नं २९०७२०२१-कोल-ललित गांधी
ओळ : वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने अध्यक्ष ललित गांधी व शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना व्यापारी व उद्योजकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
----