परकीयांची नोंदणी सक्तीची
By Admin | Updated: March 16, 2015 00:05 IST2015-03-15T23:20:15+5:302015-03-16T00:05:37+5:30
मिरजेत आदेश : लॉज, रुग्णालय चालकांना सूचना

परकीयांची नोंदणी सक्तीची
मिरज : जिल्ह्यात येणाऱ्या परकीय नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लॉज, रुग्णालय चालकांना त्यांच्याकडे येणाऱ्या परकीय नागरिकांची माहिती आॅनलाईन देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मिरजेत अरबांसह परकीय नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने लॉज, रुग्णालयांतील खोल्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्या परकीय नागरिकांनी जिल्ह्यात कोठेही वास्तव्य केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना व पोलीस मुख्यालयातील स्थानिक अन्वेषण विभागाला देणे आवश्यक आहे. मात्र परकीय नागरिकांची नोंद ठेवण्याबाबत व माहिती देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने परकीय नागरिकांनी कोठे, किती दिवस वास्तव्य केले, याची नेमकी माहिती मिळत नाही. परकीय नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केंद्रीय गृह विभागाने संकेतस्थळ सुरु केले असून, परकीय नागरिक वास्तव्य करण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यावसायिकांना या संकेतस्थळावर नोंद करावी लागणार आहे. परकीय नागरिकांचे आगमन व त्यांच्या प्रस्थानाबाबत माहिती नोंदविल्यानंतर देशभरातील सुरक्षा संस्थांना परकीय नागरिकांच्या हालचालींची माहिती मिळणार आहे. परकीय नागरिकांची माहिती न देणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मिरजेत वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या अरब नागरिकांची संख्या मोठी आहे.
मिरजेतील लॉजचालक, खासगी विश्रांतीगृहे, रुग्णालये चालकांना पोलिसांनी आॅनलाईन नोंदणी करण्याच्या व माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आॅनलाईन माहिती संकलनासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. (वार्ताहर)
परकीय नागरिक बेपत्ता होत असल्याने दक्षता
मध्य पूर्व देशातील अस्थिरता, दहशतवादी संघटनांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देशात येणाऱ्या परकीय नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून व्हिसाच्या मुदतीत त्यांना परत पाठविण्यासाठी त्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आगमन झालेले अनेक परकीय नागरिक बेपत्ता झाले असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.