आंदोलनानंतरही दुर्लक्षितच
By Admin | Updated: December 19, 2014 00:10 IST2014-12-18T23:44:21+5:302014-12-19T00:10:58+5:30
प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरूच : एन. डी. पाटील यांच्याकडून आंदोलकांची विचारपूस

आंदोलनानंतरही दुर्लक्षितच
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सलग दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरू राहिले. आज दिवसभरात या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करायला कोणाही शासकीय अधिकाऱ्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली.
जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या सुरू केले. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ, वारणा आदी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कुटुंबांसह भाग घेतला आहे.
आज या प्रकल्पग्रस्तांशी कोणी तरी शासकीय अधिकारी चर्चा करून मार्ग काढेल, अशी अपेक्षा होती; परंतु कोणीही त्यांना चर्चेस बोलाविले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल मांडून प्रकल्पग्रस्त दुपारचे व रात्रीचे जेवण बनवत आहेत. मंडपात पंगती पडतात.
आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. निर्णय झाले; परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ केली आहे. त्यामुळे आता आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा अशोक जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. (प्रतिनिधी)
कडाक्याच्या थंडीतही
सध्या शहरात कडाक्याची थंडी पडली आहे तरीही सर्व आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या फूटपाथवर बैठक मारली आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावरच थंडीत झोपावे लागत आहे. सोबतीला प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळी वाद्ये आणली असून थोडा वेळ भजन, भक्तिगीते गायली जातात. महानगरपालिकेने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.