आष्टा पालिकेने उत्पन्न वाढीवर भर द्यावा
By Admin | Updated: June 1, 2015 00:21 IST2015-05-31T23:24:40+5:302015-06-01T00:21:14+5:30
शेखर गायकवाड : शहरातील विविध विकासकामांची पाहणी

आष्टा पालिकेने उत्पन्न वाढीवर भर द्यावा
आष्टा : आष्टा पालिकेने नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात, तसेच पालिकेने स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयन करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.
आष्टा शहरातील विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी स्वागत केले. तहसीलदार रुपाली सरनोबत, मुख्याधिकारी पंकज पाटील, उपनगराध्यक्षा संगीता वारे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, शैलेश सावंत, प्रभाकर जाधव, प्रकाश मिरजकर, आब्बास लतीफ, के. टी. वग्याणी, मयूर धनवडे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
माजी आमदार शिंदे म्हणाले, आष्टा पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास साधला आहे. २००४ मध्ये स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. वर्षाखेर सर्व रस्ते, गटारींसह, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सुरू असलेली ७ लिंगांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आष्टा शहर शौचालययुक्त करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी गायकवाड यांनी अष्टलिंग तीर्थक्षेत्रांपैकी मारुती मंदिरातील रामलिंगाचे दर्शन घेतले. मंदिराबाहेर बसविण्यात आलेल्या सौरदिव्याची माहिती घेतली. आष्टा शहराच्या चावडीलाही भेट दिली. या चावडीची इमारत पाडून नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव तातडीने देण्यास त्यांनी सांगितले.
२ कोटी खर्चून बांधलेल्या काकासाहेब भाजी मंडई, फिश मार्केट, कोलाटी समाज घरकुल योजना, तसेच विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलची पाहणी केली. आष्टा पालिकेने विविध योजनेतून शहरात राबविलेल्या विकास कामांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. झुंझाराव पाटील यांनी आभार मानले.
यावेळी सौ. जमिलाबी लतीफ, मंडल अधिकारी पी. बी. उरकुटे, तलाठी प्रभाकर जाधव, दिनकर बसुगडे, तानाजी सूर्यवंशी, पद्मश्री मालगावे, नीता काळोखे, आर. एन. कांबळे, पोपट हाबळे, आर. बी. पवार, सुधीर कांबळे, राहुल हिरूगडे उपस्थित होते. (वार्ताहर)
विजेचा अडथळा
आष्टा पालिकेचा घनकचरा प्रकल्प आदर्शवत आहे. येथे कचऱ्यापासून खत निर्मिती होते. मात्र वीज नसल्याने हा प्रकल्प जिल्हाधिकाऱ्यांना पाहता आला नाही.