जिल्ह्यात रिपरिप, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण
By Admin | Updated: June 15, 2014 01:35 IST2014-06-15T01:35:45+5:302014-06-15T01:35:45+5:30
पाऊस आला रे... : गगनबावडा तालुक्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात रिपरिप, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण
कोल्हापूर : आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज, शनिवारी सकाळपासून मान्सूनचे आगमन कोल्हापूर जिल्ह्यात झाले. ग्रामीण भागात दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती, तर शहरात ढगाळ वातावरण राहिले. अनेक ठिकाणी जोरदार
पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६३ मि.मी. झाला आहे.
मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस झाले तरी पाऊस सुरू होत नसल्याने सर्वच चिंतेत होते. काल, शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुन्हा आज पहाटे दमदार पाऊस झाला. सकाळपासून ग्रामीण भागात पावसाची भुरभुर सुरू होती. नऊनंतर हळूहळू पावसाचा जोर वाढू
लागला. शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारवा मिळाला. मृग नक्षत्राचे वाहन ‘हत्ती’ असल्याने या कालावधीत पाऊस चांगला होईल, असा अंदाज होता, पण मृग निम्मा झाला तरी अजून ताकदीने पावसाची सुरुवात झालेली नाही.
गेल्यावर्षी मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेकांच्या खरीप पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. आजपासून कमी प्रमाणात का असेना, पण पावसाने सुरुवात केल्याने बळिराजाला दिलासा मिळालेला आहे. हा पाऊस खरीप पेरणीला पोषक आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताच्या उगवणीस उपयुक्त असा पाऊस झाला असून भुईमूग, खरीप ज्वारीच्या पेरणीला येत्या दोन दिवसांत वेग येणार आहे. (प्रतिनिधी)